सनातनवाद म्हणजे काय?
सनातनवादी अर्थशास्त्रीय विवेचनात−म्हणजे ॲडम स्मिथ,टॉमसस मँल्थस, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टच्यूअर्ट मिल व त्यांचा समीक्षक कार्ल मार्क्स यांच्या प्रतिपादनमध्ये मूल्यविवेचनाच्या बरोबरीनेच औद्योगिक भांडवली अर्थव्यवस्थेची जडणघडण, त्याचे गतिनियम, त्याच्या विकासक्रमाचे टप्पे, भांडवली अर्थव्यवस्थापूर्व काळातील आर्थिक ठेवण, त्यातून उद्भवलेले भांडवलशाही स्थित्यंतर, भावी संक्रमण यांचा मुख्यतः विचार झालेला आढळतो.
त्याच संदर्भात आर्थिक भरभराटीला काही अंतिम मर्यादा आहे का? असल्यास ती केव्हा, कोणत्या स्वरूपात अवतरेल? मर्यादेवरील अंतिम टप्पा अधिक सुसह्य वा स्वीकारार्ह असेल, की परिस्थिती उत्तरोत्तर दुःसह बनेल? अशा प्रकारच्या समस्यांची चर्चा सनातनवादी आर्थिक विवेचनात विस्तृतपणे आढळते. याला सर्वसाधारणतः स्थिरावस्थासंबद्ध विवेचन असे म्हणतात. स्मिथ, मॅल्थस, रिकार्डो, मिल यांचे याबाबत भिन्नभिन्न विचार होते. या अर्थाने ‘शाश्वत वृद्धी’ ची समस्या अर्थविचाराच्या काळापासून हाताळली गेली आहे. विशेतः सान्त (फाइनाइट) व निःशेषक्षम (इग्झॉस्टिबल) साधनांच्या वापरातून उद्भवू शकणाऱ्या समस्यांची सनातनवादी विचारांमध्ये स्वतंत्र व विस्तृत हाताळणी आढळते. मार्क्सप्रणीत विवेचनात स्थिरावस्थेऐवजी भांडवली आर्थिक अरिष्टांचे चक्राकार आवर्तन किंवा संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडलेल्या संभाव्य क्रांति-अवस्थेचे विवेचन आढळते.
परंतु या सर्व विवेचनाचा भर व रोख आर्थिक अभिवृद्धी (ग्रोथ), त्याचे सातत्य व शाश्वतता यांवर अधिक आहे. आज ना उद्या, पश्चिम यूरोपात अवतरली तशा प्रकारची औद्योगिक अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था जगभराच्या सर्वच देशांत उद्भवणारा, रूजणार आणि पसरणार असे गृहीत आणि तसा घोषित व व अघोषित विश्वास या विवेचनामध्ये आहे. मार्क्सने तर अशा समाजपद्धतीचे वैश्विक स्वरूप, त्याचा विलक्षण झपाटा, त्यातून उद्भवलेले अभूतपूर्व मूलगामी स्थित्यंतर या सर्वांचेच क्रांतीकारक म्हणून स्वागत केले आहे. त्याच्या स्वप्नसृष्टीतील शास्त्रीय समाजवादासाठी असा विकसित औद्योगिक समाज ही जणू पूर्वअटच आहे.
सनातनवादी परंपरेनंतर विकसित झालेल्या नव-सनातन परंपरेत बाजारयंत्रणा, आंशिक वा सार्वत्रिक समतोल, स्पर्धात्मक विश्लेषण यांवर अधिक भर राहिला. महामंदीच्या काळात व्यापारचक्रे, त्यांची कारणे, त्यांवरील व्यवहार्य उपाययोजना, बाजारयंत्रणेच्या मर्यादा यांवर अधिकाधिक विश्लेषण होत राहिले. त्यातून जॉन मेनार्ड केन्स (१८८३−१९४६) प्रणीत समग्रलक्ष्यी आर्थिक विश्लेषणाचा उगम झाला. या विश्लेषणामुळे सरकारी हस्तक्षेपाला, त्याच्या संभाव्य परिणामांना अधिक उजाळा व प्रतिष्ठा मिळाली. अभिवृद्धी व त्यातील चक्राकार चढउतार आटोक्यात ठेवण्याबाबतची उपाययोजना यांबाबत आर्थिक धोरणात्मक विवेचन निराळ्या पैलूने होऊ लागले. सरकारी हस्तक्षेप, गुंतवणूक, राजकोषीय व्यवहार, सार्वजनिक कर्ज, खर्च यांबाबतचा दृष्टिकोन पूर्वीच्या तुलनेत मूलतः बदलला.
असे असले तरी, आर्थिक विश्लेषणामध्ये अप्रगत वा अविकसित, अर्धविकसित राष्ट्रांची आर्थिक स्थिती, त्याचे स्वतंत्र गतिनियम यांची स्वतंत्र दखल घेतली जात नसे. वर उल्लेखिलेली सनातन परंपरा व त्यानंतरची विकसित झालेली नव-सनातन परंपरा यांमध्ये विकसित झालेल्या सैद्धांतिक अन्वेषण-पद्धतींचा वापर अविकसित अर्थव्यवस्थांच्या विश्लेषणासाठी करण्यात येऊ लागला. या अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती प्रश्नांचे स्वरूप काहीसे भिन्न होते. परंतु ती वैशिष्ट्ये सामावून घेऊन वृद्धीविषयक व विकासविषयक प्रश्नांची हाताळणी करण्यात येऊ लागली. त्याच प्रक्रियेत काही सैद्धांतिक प्रतिमाने व ऐतिहासिक विवेचन (इतिहासाचे परिशीलन वा नवे आकलन) उदयास आले.
औद्योगिकीकरणाच्या व आर्थिक अभिवृद्धीच्या परिणामी व त्याच्या जोडीने अन्य सामाजिक परिवर्तने होत गेली. उदा., सर्वसाधारण शिक्षणाचा प्रसार व सार्वत्रिक अंगीकार, स्त्रीशिक्षणाचा प्रसार, स्त्रीस्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा, स्त्रीहक्क, स्त्रियांचा आर्थिक सहभाग यांमध्ये लक्षणीय सुधारणा (वाढ व परिवर्तने), रोगराईला आळा, धर्मसंस्थांचा प्रत्यक्ष राजकीय पगडा व प्रभाव कमी होणे इत्यादी. आर्थिक अभिवृद्धीच्या जोडीला जीवनमानात होणारे गुणात्मक बदल, संस्थात्मक पुनर्घटन किंवा परिवर्तन या सर्व वैशिष्ट्यांना समुचित रीत्या ‘विकासप्रक्रिया’ म्हटले जाते. विकासप्रक्रियेचे गुणात्मक वर्णन व संख्यात्मक मापन हे निव्वळ आर्थिक अभिवृद्धिपेक्षा अधिक व्यामिश्र व व्यापक बनते.
‘विकास’ या संज्ञेचा अर्थ व्यापक व व्यामिश्र असल्यानेच विकासाचे मापन बहुपेडी व बहुपदरी असावे लागते. त्यामुळे विकासाच्या मापनात संख्याशास्त्रीय संदिग्धता व समस्या अधिक असतात. विकासाची व्याख्या, निकष तसेच गुणवैशिष्ट्ये यांबाबत संशोधकांमध्ये किंवा धोरणकर्त्यांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. यामध्ये वेगवेगळ्या विचारप्रणालींनुसार, जीवनमूल्यांनुसार व वैयक्तिक पसंतीनुसार मतभेद विपुल प्रमाणात आढळतात. उदा. औद्योगिकीकरण विकासात्मक नसून विनाशी व अदूरदृष्टीचे आहे, कमीत कमी भौतिक-मानसिक गरजांवर आधारलेली निसर्गाश्रयी समूहनिष्ठ अर्थव्यवस्था हाच खरा विकास होय, असे प्रतिपादन करणारे विचारवंत व गट आहेत. तात्पर्य, विकास हे सर्वमान्य ध्येय असले, तरी त्या ध्येयाचे स्वरूप व अन्वय वा आकलन आत्यंतिक भिन्न भिन्न प्रकारचे असू शकते.
सनातनवाद म्हणजे काय?
✅ Updated recently