सामाजिक मानसशास्त्र( Social psychology ) :
सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले.समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला.
विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली.माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले.
सामाजिक मानसशास्त्रीय संकल्पना काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.