मागणीची उत्पन्न-लवचिकता
वस्तूच्या किंमतीच्या बदलाच्या संदर्भात मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण मागणीची मूल्याधिष्ठित लवचिकता दर्शविते. परंतु समाजाच्या आणि व्यक्तीच्या उत्पन्नांत होणाऱ्या बदलांनुसार वस्तूच्या मागणीत जो बदल संभवतो, त्याच्या संदर्भात मागणीची उत्पन्न-लवचिकता मोजली जाते. व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न वाढले असता ज्या वस्तूंच्या बाबतीत (उदा., गॅस, पाणी-पुरवठा, घरभाडे, अन्नधान्ये) खर्चाचे प्रमाण वाढत नाही, त्या वस्तूंच्या बाबतीत मागणीची उत्पन्न-लवचिकता फार कमी असते; याउलट ज्या वस्तूंच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढत जाते, त्यांच्या मागणीची उत्पन्न-लवचिकता अधिक असते. या बाबतीत महत्त्वाचा नियम एर्न्स्ट एंगेल या जर्मन संख्याशास्त्रज्ञ - अर्थशास्त्रज्ञाने मांडला, म्हणून तो नियम ‘एंगेलचा नियम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या नियमानुसार, ‘जसजसे कुटुंबाचे उत्पन्न वाढत जाते, तसतसे सर्वच वस्तूंवरील खर्च सारख्या प्रमाणात वाढत नाही; अन्नावरील खर्चाचे प्रमाण कमी होत जाते; कपडालत्ता, घरभाडे, जळण, दिवाबत्ती ह्यांवरील खर्चाचे प्रमाण जवळजवळ कायम राहते; आणि शिक्षण, चैनीच्या वस्तू यांवरील खर्चाचे प्रमाण वाढत जाते’. १८५५ मध्ये एंगेलने जर्मनीतील सॅक्सनी परगण्यातील अनेक कुटुंबांच्या अंदाजपत्रकांचा अभ्यास करून हा नियम प्रस्थापित केला.
मागणीच्या लवचिकतेचे महत्व
वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे अर्थशास्त्रीय विवेचनात फार महत्त्व आहे. वस्तूच्या किंमतींतील चढउतार मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असतात. वस्तूची मागणी अतिलवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमतीमध्ये फारसा फरक होणार नाही; याउलट मागणी कमी लवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमत जास्त प्रमाणात वाढेल. तसेच मक्तेदार उत्पादक आपला निव्वळ नफा अधिकतम करण्यासाठी वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेनुसार किंमत ठरवितो. सरकार निरनिराळ्या वस्तूंवर जकाती लादताना जकातीचे दर वस्तूंच्या मागणीच्या लवचिकतेवर ठरविते.
उत्पन्न लवचिकता म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.