अंतिम ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी व पाहिजे त्या स्वरूपात वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठे व्यापारी, लहान व्यापारी, दलाल ह्यांची बाजारपेठेत एक साखळी तयार झालेली असते. बाजारभावानुसार उत्पादकाचे उत्पन्न ठरत असल्याने, त्या अनुषंगाने उत्पादनाची लक्ष्ये व योजना ठरविल्या जातात. अशा बाजारपेठेत विक्रेता व ग्राहक ह्यांच्या सौदाशक्तीला महत्त्व येते बाजारात ठरणारी अंतिम किंमत व्यवहारसापेक्षत: दुर्बल स्थिती असणाऱ्या घटकाच्या दृष्टीने उचित नसल्याने त्या घटकाचे नुकसान होते. अशी परिस्थिती मुख्यत: शेतमालाच्या बाजारपेठेत विशेषत्वाने आढळते. उत्पादक शेतकऱ्यांतील संघटनेचा अभाव, अज्ञान, परंपरेने चालत आलेले दारिद्र्य व परिणामी मिळेल त्या किंमतीला माल विकण्याची निकड यांमुळे त्यांची सौदाशक्ती कमी असते. भारतात शेती व उद्योगक्षेत्रांदरम्यान असणाऱ्या सापेक्ष व्यापारशर्ती शेतीला प्रतिकूल, तर उद्योगक्षेत्राला अनुकूल असल्याने १९७९-८॰ मध्ये शेतीक्षेत्राचे सु. १,६॰॰ कोटी. रु. चे नुकसान झाल्याचे अनुमान करण्यात येते. त्यामानाने खरेदीदार हे संघटित व संपन्न असल्याने त्यांच्या स्पर्धेत शेतकऱ्याचा टिकाव लागत नाही. बाजारपेठेत माल विकावयास आणणाऱ्या उत्पादकाच्या मालापोटी खर्चवेच व निरनिराळे अयोग्य आकार वजा करून त्याला फारच कमी किंमत दिली जाते. बाजारपेठेतील या अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्याच्या हेतूने ‘नियंत्रित बाजारपेठां’ची निर्मिती करण्यात आली बाजारपेठेतील उत्पादक या घटकाचा नैसर्गिक दुबळेपणा घालवून सर्व घटकांना त्यांचे व्यवहार समान पातळीवर व खुल्या वातावरणात करता यावेत, हा नियंत्रित बाजारपेठा स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश होय.