रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली. ती स्वतःला सुलतान म्हणवून घेत असे, तिच्यापुर्वी कोणत्याही स्त्रीला ही बिरुदावली मिळाली नव्हती.

१० नोव्हेंबर १२३६ मध्ये ती जलालत-उद-दिन रझिया या नावानेच सत्तेत आली. सत्ता ग्रहण करताच तिने स्त्रियांप्रमाणे पारंपारिक वेश झुगारून ती पुरुष शासकांप्रमाणेच वेशभूषा करू लागली.

रझियाने अनेक प्रदेश काबीज केले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार वाढवला. लढाईमध्ये ही आपल्या सैन्याचे नेतृत्व स्वतःच करीत असे आणि प्रत्यक्ष लढाईत सहभागी होत असे. प्रशासनावरील तिची पकड इतकी मजबूत होती की, दिल्लीच्या अनेक उत्तम शासकांमध्ये तिचाही समावेश होतो.