जिल्हाधिकारी हा नगरपालिकेचा अध्यक्ष असे.

कामकाजविषयक नियम प्रत्येक नगरपालिकेने बनवायचे आणि गव्हर्नरांनी मंजूर केल्यानंतर अंमलात आणायचे, अशी प्रथा होती. घरपट्टी व जकात हे कर बसविण्याचा नगरपालिकेला अधिकार होता आणि रस्ते, सफाई, पाणी पुरवठा वगैरे कामे आवश्यक मानली होती. सोलापूर नगरपालिकेचे १८५२-५३ सालचे पहिले अंदाजपत्रक रु. ३०,००० चे होते. काही उल्लेखनीय कामे पार पाडूनही त्यांपैकी काही रक्कम शिल्लक राहिली. म्हणून लोकांनी नगरपालिकेला 'सुधारणी' हे नाव बहाल केले.
नगरपालिकेच्या वर्षातून किमान सहा सभा झाल्या पाहिजेत. विविध समित्यांचे सभासद यांची निवड करणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, धोरणविषयक निर्णय घेणे व कारभारावर सर्वसाधारण देखरेख ठेवणे ही नगरपालिकेची कामे होत. नगरपालिकेची कर्तव्ये व विवेकाधीन कामे यांची यादी कलम ४९ मध्ये देण्यात आली आहे. सार्वजनिक रस्ते व ठिकाणे यांची स्वच्छता व दिवाबत्ती, आग विझविण्याची व्यवस्था, जन्म-मृत्यूची नोंद, पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा स्थापणे व चालविणे, कलम १०५ मध्ये नमूद केलेले आवश्यक कर बसविणे अशी २२ कर्तव्यांची नोंद करण्यात आली आहे. नवे रस्ते व रुग्णालये बांधणे, मैदाने व बागीचे यांची व्यवस्था करणे, कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे वगैरे २४ विवेकाधीन विशेष तरतुदी आहेत.

वेडे व कुष्ठरोगी यांच्या उपचारासाठी शहरातील किंवा जवळपासच्या रुग्णालयाला मदत देण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्यास ते पाळण्याचे नगरपालिकेवर बंधन आहे. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून दररोज दरडोई सत्तर लिटर पाणी मिळेल अशा प्रकारची योजना कायदा सुरू झाल्यापासून एका वर्षाच्या आत बनवावी व पाच वर्षांच्या आत ती अंमलात आणावी, अशी विशेष तरतूद करण्यात आली आहे.