नवकवितेचे जनक

मानवतेची बिजे ज्यांच्या वाणीवृत्तीत रुजलेली होती ते कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. बालपणीचा काळ वगळता अगदी अल्पकाळच मालगुंडमध्ये कवीवर्याचे वास्तव्य होते. मात्र या घराशी जोडलेली नाळ कधी तुटता तुटली नाही. याच भूमीत आपल्याला मिळते ऊर्जा आणि कवितेचा हुंकारसुद्धा.आज जाऊ या कवी केशवसुतांच्या गावात..!

मानवतेची बिजे ज्यांच्या वाणीवृत्तीत रुजलेली होती ते कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. कवीवर्याचे वडील – केशव दामले मूळ दापोलीचे. ते शिक्षक म्हणून मालगुंडच्या शाळेत दाखल झाले आणि फडके कुटुंबीयांच्या घरात भाडयाने वास्तव्यास राहिले. याच घरात १५ मार्च १८६६ साली केशवसुतांचा जन्म झाला.

वडिलांची सतत होणारी बदली म्हणूनच बाळपणीचा काळ वगळता अगदी अल्पकाळच मालगुंडमध्ये कवीवर्याचे वास्तव्य होते. मात्र या घराशी जोडलेली नाळ कधी तुटता तुटली नाही. ‘गोष्टी घराकडील मी दता गडया रे’ सारख्या कविता याची साक्ष आहेत.

कवी केशवसुतांचे स्मारक म्हणून या घराला आज वेगळे महत्त्व आले आहे. गणपतीपुळे येथे दररोज हजारो लोक येतात. त्यातील मोजकीच माणसे मालगुंडला भेट देतात. वास्तू कशी आहे त्यापेक्षा त्या वास्तूत वास्तव्य कोणी केले हेच महत्त्वाचे!

केशवसुतांचे हे जन्मस्थान वैशिष्टयपूर्णच आहे. खरे तर कोकणातील इतर अनेक घरांसारखेच वाटणारे हे घर अगदी वेगळे आहे. पाच खोल्यांची ही वास्तू जांभ्या दगडाची असून साग लाकडाचे, कौलारू छप्पर असलेली.

प्रशस्त दोन्ही अंगास बिलगलेली लंबाकृती पडवी, प्रशस्त ओटी, कोनाडी, खुर्ची, आरामखुर्ची, ओटीच्या पाय-यांलगतचे नक्षीदार खांब, कवी केशवसुतांची प्रतिमा, नवा शिपाई आणि इतर कविता, तत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन – पिकदानी, चरखा, डेस्क, दौत-टाक इ. कालबाहय झालेल्या वस्तू आजही तेथे पाहावयास मिळतात.

या वास्तूचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आज घरात उजव्या हातास असलेली केशवसुतांची जन्मखोली. आकाराने लांब, एकच कोनाडा, लहान खिडकी असलेली उबदार खोली पाहताना या खोलीत जन्मलेल्या बालकाने १९व्या शतकाच्या उंबरठयावर उत्तमोत्तम कविता लिहून केलेली क्रांती आठवल्यावाचून राहत नाही.

केशवसुतांच्या या वास्तूमागचे ‘स्मृतिदालन’ दिसते. येथे प्रवेश करताच केशवसुतांच्या सतारीचे बोल, झपुर्झा, संध्याकाळ, तुतारी इ. अजरामर काव्यशिल्पे दृष्टीस पडतात. ‘वृक्ष लावणारे निघोनिया जाती, तळी विसावती सानथोर.’ या उक्तीप्रमाणे कवी केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक का मानले जाते? त्या आधी कविता लिहिली गेली नव्हती का? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कवी केशवसुतांनी एकूण १३२ कविता लिहिल्या. त्यांच्या हयातीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच कविता प्रकाशित झाल्या. त्यांच्या मृत्यूनंतर ‘केशवसुतांची कविता’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सौंदर्यवादी दृष्टिकोन, कौटुंबिक जिव्हाळा, निसर्ग कविता, राष्ट्रभक्ती, अनुभव विश्वावर आधारित कविता हे त्यांच्या काव्याचे विशेष.

स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म-समभाव, संवेदनशीलता इ. मूल्ये आधीच त्यांच्या कवितेतून उत्कटपणे साकारली होती. स्त्रीला त्यांनी सन्मानतेची वागणूक दिलीच आणि पूर्ण वैचारिक, निर्णय स्वातंत्र्यही दिले. नात्यांत कधी व्यवहार येऊ दिला नाही, हेही विशेषच.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १८८४ला त्यांनी दाखल केले. तेव्हा देशभक्त बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर शिक्षक असलेली ही शाळा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती.

मात्र देशसेवेचे बाळकडू इथेच त्यांना मिळाले. म्हणूनच ‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी जी स्व-प्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने’ अशी कविता ते लिहू शकले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा अभ्यास चांगला असला तरी गणिताचे अगदी वावडे म्हणून तिस-या प्रयत्नात वयाच्या २३ वर्षी ते मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाले आणि आपले औपचारिक शिक्षण थांबवून त्यांनी जीवनाच्या शाळेत प्रवेश घेतला. आपल्या चरितार्थासाठी उत्पन्नाची साधने निर्माण केली.
७ नोव्हेंबरमध्ये प्लेगच्या साथीने वयाच्या ३९व्या वर्षी त्यांचा बळी घेतला. तरीही त्यांच्या कवितांमुळे जे जनमाणसात-रसिकमनावर अधिराज्य गाजवत राहिले. कवीची थोरवी त्यांनी स्वत:च तर सांगितलीय.

केशवसुत स्मारक

सरकारी पुढाकाराने १९६६ साली केशवसुतांच्या जन्मशताब्दीचा सोहळा झाला. केशवसुतांच्या जन्मग्रामी ‘मालगुंड’ येथे झालेल्या समारंभात तेथील ग्रामस्थांनी केशवसुतांच्या कीर्तीला साजेसे स्मारक या ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण केशवसुतांच्या जन्मशताब्दीच्या या समारंभानंतर पंचवीस वर्षे उलटल्यानंतरही केशवसुतांच्या स्मारकाच्या दृष्टीने काही घडले नव्हते. १९९० साली रत्नागिरी येथे चौसष्टावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानी मधु मंगेश कर्णिक यांची निवड झाली होती. त्यांनी संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केशवसुत स्मारकाची कल्पना मांडली. स्मारकासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन त्या सभेतील श्रोत्यांना केले.

मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिका-यांनी काही अटींवर केशवसुतांचे जन्मघर आणि त्यालगतची एक एकर जमीन कोकण मराठी साहित्य परिषदेला विनामूल्य दिली. महाराष्ट्र राज्याचे त्या वेळचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तत्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश मधु मंगेश कर्णिक यांना दिला. महाराष्ट्र सरकारप्रमाणे मुंबई महानगरपालिका, कोकणातील नगर परिषदा, नागोठण्याची इंडियन पेट्रोकेमिकल्स, मुंबईचा महालक्ष्मी ट्रस्ट, खासगी देणगीदार आणि खुद्द केशवसुतांचे वंशज यांनी स्मारकाचा बहुतेक आर्थिक भार उचललेला आहे.

१९९२-१९९५ या काळात मधु मंगेश कर्णिक यांनी यासाठी २०-२२ लाख रुपये जमवले. त्यांनी आराखडयाप्रमाणे काम पूर्ण करून घेतले आणि ८ मे १९९४ रोजी या स्मारकाचे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येऊन ते महाराष्ट्राला अर्पण करण्यात आले. अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकाचे ते सुंदर चिरस्मरणीय स्मारक गणपतीपुळे या निसर्गरम्य देवस्थानापासून दोन कि. मी. अंतरावर आहे.