निश्चित भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समाजाला काय म्हणतात?
एकाच गावाखाली येणाऱ्या अशा वस्त्यांना महाराष्ट्रात वाड्या किंवा पाडे म्हणतात.

खेड्यातील लोकांची घरे एकमेकांच्या अगदी निकट आहेत, की एकमेकांपासून अलग किंवा लांब आहेत, यांवरून हे स्वरूप ठरते. जगात दोन्ही प्रकारची गावे आढळतात. भोवताली शेतजमिनी पसरलेल्या आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे, हे खेडेगावाचे स्वरूप सर्वांच्या परिचयाचे आहे. प्रत्येकाचे घर जेव्हा स्वतःच्या शेतजमिनीने किंवा फळबागांनी वेढलेले असते, तेव्हा साहजिकच घराघरांमध्ये अंतर असणे अपरिहार्य ठरते. वस्तीचा तिसरा एक प्रकार डोंगराळ भागात किंवा शेतजमीन अपुरी वा कमी असल्यास दिसून येतो. डोंगराळ भागांत दऱ्याखोऱ्यांतून अगर माळरानावर शेतीकरिता सलग आणि मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नसते. जी जमीन एकत्र उपलब्ध असते, ती सर्वसाधारणपणे दोन–चार कुटुंबाना पुरणारी असते. म्हणून अशा प्रदेशात दोन–चार कुटुंबांची घरेच एकत्र दिसतात. बहुतेक मैदानी प्रदेशात सर्वांची घरे एकत्रित वा केंद्रीकृत असलेली गावे अधिक दिसतात आणि नदीकाठी, नदीच्या मुखाजवळील प्रदेशात किंवा भातशेतीच्या प्रदेशात तुरळक वस्तीची गावे दिसतात. अमेरिकेत प्रथम वसाहतीस आलेल्या गोऱ्या लोकांची गावे ही या नियमाला अपवाद होत. लागवडीलायक जमीन मुबलक असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे घर हे त्याच्या मालकीच्या शेताच्या मध्यभागी होते. म्हणून घराभोवती प्रत्येकाची शेतजमीन पसरली असल्यामुळे त्यातून केंद्रीकृत गाव निर्माण होणे शक्यच नव्हते. त्याचप्रमाणे ब्रिटिश बेटांवरील सर्वच भागांत (इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड व आयर्लंड) अलग अलग पसरलेली वस्तीच प्रामुख्याने दिसून येते. इतर पाश्चिमात्य देशांत दोन्ही प्रकारांची गावे प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार दिसून येतात.

भारतात सपाट मैदानी प्रदेशात केंद्रीकृत गावेच दिसून येतात. याच गावांना भारतीय ग्रामीण जीवनाचे प्रातिनिधिक स्वरूप आलेले आहे. बहुसंख्य भारतीय गावे याच प्रकारची आहेत. परंतु हिमालयाच्या पायथ्याशी व अन्य डोंगराळ भागांत सलग लागवडीलायक जमीन कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे महसूलाच्या हिशेबाने एकाच गावाखाली येणाऱ्या लहान लहान अशा अनेक वस्त्या दिसतात. एकाच गावाखाली येणाऱ्या अशा वस्त्यांना महाराष्ट्रात वाड्या किंवा पाडे म्हणतात. डोंगराळ भागातील काही गावांच्या वीस ते पंचवीसपर्यंतही वाड्या आहेत. अशा वाड्या मैदानी भागातील गावांच्याही आहेत; परंतु आकाराने त्या डोंगराळ भागातील वाड्यांपेक्षा सरासरीने मोठ्या आहेत. गावातील प्रत्येक घर भातशेतीने अगर फळबागांनी वेढलेले असल्याने, दक्षिण बंगाल, दक्षिण पंजाब, कोकणपट्टी आणि मलबार प्रदेश या ठिकाणी अशी घरे अलग पडलेली गावे दिसून येतात. या भागांत रस्त्याचे दुतर्फा अशा घरांची रांगच दिसते आणि एक गाव कोठे संपते व दुसरे कोठे सुरू होते, हे सहसा कळत नाही.

ग्रामवस्तीचे हे भिन्न प्रकार मुख्यतः भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि शेतीविषयीची अर्थव्यवस्था यांवर अवलंबून आहेत, असे म्हटले जाते. भौगोलिक परिस्थितीत भूपृष्ठाची वर निर्देशिलेली वैशिष्ट्ये, जमिनीचे गुणदोष, पाण्याची सोय इ. बाबी येतात. जेथे नद्यांच्या महापुराचा धोका असेल, तेथे उंचवट्यावर सर्वांची घरे एकत्रित असलेली दिसतात. त्याचप्रमाणे लागवडीलायक अशी जमीन सलग असली, तरी केंद्रीकृत गावे अधिकतर दिसून येतात. पाण्याची पुरेशी सोय नसल्यास विहीर, तलाव, झरा इत्यादींच्या लगत सर्वांची घरे एकत्रित असणे अधिक फायदेशीर ठरते. परंतु वस्तीच्या स्वरूपाबाबत पाण्याची सोय ही तितकीशी निर्णायक ठरत नाही, असेही दिसून आले. सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात गावकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आणि मालमत्तेची व्यवस्था ह्या प्रामुख्याने उल्लेखिल्या जातात. एकाच कुळीचे वा वंशाचे किंवा समान संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहतात, असे काहींचे म्हणणे आहे. या बाबतीत एकवाक्यता दिसून येत नाही. काही ठिकाणी भिन्नभिन्न वंशांचे लोकही एकत्र राहत आले आहेत. समान संस्कृती ही एकत्र राहण्याची व त्यायोगे येणाऱ्या अन्योन्य संबंधांची परिणती होऊ शकते. समान व्यवसायांच्या गरजाही समान असतात. त्यांत एकमेकांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. मदतीची अन्य साधने उपलब्ध नसल्यास समान व्यवसायांतील लोकांनी एकत्र राहून आपल्या समस्या सोडविणे आवश्यक ठरते. शेतीव्यवसायात नांगराचा वापर सुरू झाल्यापासून एकमेकांच्या मदतीची आवश्यकता अधिक भासू लागली आणि त्यामुळे एकत्र राहणे अपरिहार्य ठरले, असे काहींचे म्हणणे आहे. वन्य जनावरांपासून किंवा उपद्रवकारक टोळ्यांपासून संरक्षण मिळावे आणि प्रसंग पडल्यास इतरांची मदत मिळावी, म्हणूनही केंद्रीकृत गाव हे आवश्यक ठरले असावे, असा काहींचा तर्क आहे. पंरतु सर्वच केंद्रीकृत गावे ही या उद्दिष्टाने अस्तित्वात आलेली नाहीत. लागवडीखाली आणलेल्या सर्व सलग जमिनीचा मालक एकच असला, तर तो आपल्या अनेक कुळांवर नियंत्रण ठेवणे सुलभ व्हावे, कोणीही आपल्या ताब्यातून फुटून जाऊ नये, म्हणून सर्वांची वस्ती एकत्रच असणे पसंत करतो, असे म्हटले जाते. परंतु काही ठिकाणी सर्व कुळे एकत्र आली तर आपली सत्ता कदाचित झुगारून देतील, या भीतीने कुळांना अलग अलग ठेवल्याची उदाहरणेही आहेत. अशारीतीने वरील एक किंवा अनेक कारणांमुळे केंद्रीकृत गावे अस्तित्वात आली असण्याची शक्यता आहे. त्यांच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण अमुक अशा एकाच कारणाच्या आधारे करता येत नाही.