हवाई वाहतूक, भारतातील :
हिंदुस्थानात प्रथम १९११ मध्ये टपालाची ने-आण करून हवाई दळणवळणाला प्रारंभ झाला. त्यानंतर टपालाची ने-आण करण्याकरिता १९२० पासून विमानांचा सर्रास उपयोग होऊ लागला परंतु अल्पावधीतच हा प्रयोग बंद करण्यात आला. १९२६ मध्ये ब्रिटिश वासाहतिक देशांच्या परिषदेत साम्राज्यांतर्गत देशांशी दळणवळण चालू ठेवण्याच्या हेतूने हिंदुस्थानमार्गे एक हवाई वाहतूक करण्याचे ठरले. त्यानुसार ३० मार्च १९२९ रोजी एक विमान इंग्लंडमधील क्रॉयडनच्या (लंडन) विमानतळावरून निघून ७ एप्रिल १९२९ रोजी कराची, सिंध येथे सुखरूप येऊन पोहोचले. त्याचप्रमाणे तेच विमान ७ एप्रिल रोजी कराचीहून निघून इंग्लंडला १४ एप्रिल रोजी सुखरूप उतरले. यानंतर कराची ते दिल्ली ही आंतर्देशीय विमान वाहतूक ‘इंडियन स्टेट एअर सर्व्हिसेस’ ही हवाई कंपनी स्थापन करून तिच्यामार्फत चालू झाली. या वाहतुकीकरिता विमाने, ती चालविणारे वैमानिक, इतर तंत्रज्ञ इ. सर्व सरंजाम ‘इम्पीअरिअल एअरवेज’ या एका इंग्रज कंपनीला ठेक्याने दिला होता. हा करार १९३१ मध्ये संपुष्टात आला पण त्याचे नूतनीकरण झाले नाही. तेव्हा अन्य व्यवस्था होईपर्यंत ‘दिल्ली फ्लाइंग क्लब’ या संस्थेकडे कराची व दिल्ली या दोन ठिकाणच्या टपालाची ने-आण करण्याचे काम सोपविण्यात आले. तिने जुलै १९३३ पर्यंत ही कामगिरी अत्यंत उत्तम रीतीने पार पाडली.
त्या दरम्यान ‘टाटा सन्स लिमिटेड’ या एका खासगी कंपनीने अथक प्रयत्न करून ब्रिटिश शासनाची परवानगी मिळवून काहीही वेगळा आर्थिक मोबदला न घेता भारतीय टपालाची कराची–दिल्ली–मद्रास यांदरम्यानची वाहतूक करण्याची परवानगी दहा वर्षांकरिता मिळविली. ‘इम्पीअरिअल एअरवेज’ या इंग्रज कंपनीला लंडन ते कराचीपर्यंत सुरू असलेली टपालाची वाहतूक पुढे हिंदुस्थानातून सिंगापूरपर्यंत वाढवावयाची होती. पुढे ‘इंडियन ट्रान्स कॉन्टिनेन्टल एअरवेज’ या नावाची आणखी एक नवी कंपनी हिंदुस्थानात उभारण्यात आली. त्या कंपनीचे भांडवल ‘इम्पीअरिअल एअरवेजङ्ख, भारत सरकार व भारतात नव्यानेच स्थापन झालेल्या ‘इंडियन नॅशनल एअरवेज’ यांच्याकडून उभे करण्यात आले. कंपनीने कराची ते सिंगापूर अशी टपाल व प्रवासी यांची ने-आण आठवड्यातून एकदा याप्रमाणे करण्याचा करार केला व त्याप्रमाणे वाहतूक केली. हा करार १९३९ च्या मार्च महिन्यात संपला.
या सुमारास भारतात ‘टाटा सन्स लिमिटेड’ व ‘इंडियन नॅशनल एअरवेज’ अशा दोन विमान वाहतूक कंपन्या अस्तित्वात होत्या. कराची, डाक्का व रंगून (त्या वेळेस ब्रह्मदेश भारताचा भाग होता) यांदरम्यान म्हणजे फक्त भारतीय सरहद्दीतच या कंपन्या वाहतूक करीत. १९३८ मध्ये भारत सरकारने ‘एम्पायर एअर मेल स्कीम ङ्खला अनुलक्षून या दोन कंपन्यांबरोबर टपालाची ने-आण करण्याचा १५ वर्षे मुदतीचा करार केला. त्या करारा-मुळे ‘टाटा सन्स लिमिटेड’ कंपनीला पुष्कळच फायदा झाला. कंपनीने श्रीलंका सरकारशी खर्चात सहभागी होण्याचा करार केल्यामुळे ‘टाटा सन्स लिमिटेड ङ्खने आपली वैमानिक वाहतूक थेट कोलंबोपर्यंत वाढविली. याखेरीज १९३७ च्या सुमारास ‘एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया’ या नावाची तिसरी विमान वाहतूक कंपनी स्थापन होऊन तिने गुजरात व सौराष्ट्र या भागांतील वाहतूक सुरू केली. या नव्या कंपनीला सौराष्ट्रामधील निर-निराळ्या राजे-रजवाड्यांनी सांपत्तिक मदतीचे आश्वासन दिले मात्र भारत सरकारने मदत देण्याचे नाकारल्यामुळे या कंपनीला आपले काम लवकरच स्थगित करावे लागले.
पाच ब्रिटिश, तीन डच व एक फ्रेंच अशा नऊ विमान वाहतूक कंपन्या भारतातून आंतर्देशीय हवाई वाहतूक करीत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस भारत हळूहळू जागतिक हवाई वाहतुकीच्या नकाशावर येऊ लागला परंतु याच वेळी ‘इम्पीअरिअल एअरवेज’ हवाई वाहतूक स्थगित करण्यात आली. भारतातील ‘टाटा सन्स लिमिटेड’ व ‘इंडियन नॅशनल एअरवेज’ या दोन कंपन्यांकडे सरकारी हवाई वाहतूक सोपविण्यात आली. पुढे लवकरच या कंपन्यांस वाहतुकीसाठी मोठमोठी विमाने मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. महायुद्धानंतर मुलकी हवाई वाहतूक पूर्ववत दोन कंपन्यांकडे सोपविण्यात आली. त्यांना उपलब्ध झालेल्या मोठमोठ्या विमानांमुळे या कंपन्यांनी आपले क्षेत्रही वाढविले. त्यात जुलै १९४६ पर्यंत ‘एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया’ व ‘डेक्कन एअरवेज’ अशा आणखी दोन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची भर पडली.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर मित्र राष्ट्रांनी भारतातून परत जाताना मागे ठेवलेल्या हवाई युद्ध सामग्रीमुळे भारतातील हवाई वाहतुकीच्या उद्योगाला चालना मिळाली. १९४७ च्या सुरुवातीस भारतात हवाई दळणवळण करण्याच्या उद्देशाने एकंदर सु. २१ कंपन्यांची नोंद झाली. त्यांपैकी नऊ कंपन्यांनी तर त्या सालच्या ऑगस्ट महिन्यापासूनच हवाई वाहतूक सुरू केली. त्या कंपन्या अमेरिकन डकोटा जातीच्या विमानांनी वाहतूक करीत होत्या.
स्वातंत्र्योत्तर काळात हवाई वाहतुकीत आमूलाग्र बदल झाले. नऊ कंपन्यांखेरीज आणखीही कित्येक कंपन्यांची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर या कंपन्यांनी पाकिस्तानमधून निर्वासित व इतर निराश्रितांस भारतात आणण्याच्या कामी फार मोठी कामगिरी बजावली. पुढे याच विमान कंपन्यांचा उपयोग काश्मिरी जनतेच्या गरजा पुरविणे व भारत-काश्मीर यांमधील प्रवासी वाहतूक करणे यांसाठी झाला.
‘एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड’ या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीची स्थापना झाल्यानंतर भारताचे हवाई दळणवळण भारताबाहेरील देशांशी सुरू झाले. १९४९ पर्यंत हवाई वाहतूक करणाऱ्या ११ कंपन्या स्थापन झाल्या. त्यांद्वारे देशांतर्गत शहरांची तातडीची टपाल वाहतूक होऊ लागली.
भारतात व भारताबाहेर वाहतूक करणाऱ्या एकंदर नऊ हवाई कंपन्या (शेड्यूल्ड एअर ट्रान्सपोर्ट कंपन्या) होत्या (१९५३). ३१ जुलै १९५३ रोजी या सर्व विमान वाहतूक कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यातून ‘एअर इंडिया इंटरनॅशनल कॉर्पोरेशन’ व ‘इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन’ अशा दोन राष्ट्रीय मालकीच्या हवाई कंपन्या अस्तित्वात आल्या. ‘एअर इंडिया इंटरनॅशनल कॉर्पोरेशन’ कडे परदेशी वाहतूक व ‘इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन’ कडे देशांतर्गत वाहतूक सोपविण्यात आली तथापि अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार) वगैरे शेजारच्या देशांची हवाई वाहतूक ‘इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन ङ्खकडेच सोपविण्यात आली.
भारत सरकारने किती साली हवाई कायदा मंजूर केला?
✅ Updated recently