मूल्य हे प्राप्तव्य असते, साध्य असते, प्रस्थापित करावयाचे असते. मूल्य पुरुषार्थ आहे, वस्त्वर्थ नव्हे. वस्तुस्थिती अशी आहे आणि तशी नाही, हा जसा अनुभवाचा एक अंश आहे तसाच ती अशी असावी आणि तशी नसावी, हा दुसरा एक अंश आहे. 'आहे' आणि 'असावयास हवे' यांतील हा प्रकार म्हणजे तथ्य (फॅक्ट) व मूल्य यांतील फरक होय.