जगातील या सगळ्यात जुन्या लोकशाही पद्धतीत राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी (संविधानातील कलम २ अनुच्छेद १ प्रमाणे) तीन मुख्य अटी आहेत- ती व्यक्ती जन्मानं अमेरिकेची नागरिक असावी, १४ वर्षं अमेरिकेत वास्तव्य असावं, ३५ वर्षं वय पूर्ण असावं. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष बनू शकते. फ्रँकलिन रुझवेल्ट चौथ्या वेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा संविधानात कार्यकाळ निश्चित करण्यासंबंधी २१वी सुधारणा केली गेली. ‘पक्षातील अन्य नेत्यांना राष्ट्राध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे’, ही त्यामागील उदात्त भूमिका होती. हा निर्णय परिपक्व लोकशाही व्यवस्थेला शोभेल असाच आहे!