वस्ती भूगोल म्हणजे काय?
वस्ती : पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरतो. विशिष्ट सजीवास विशिष्ट पर्यावरणीय घटकांची आवश्यकता असते. काही प्रमाणात उपलब्ध नैसर्गिक घटकांत सजीव आवश्यक ते फेरफार घडवून आणतो व ‘वस्ती’ निर्माण करतो. वस्तीमध्ये त्या सजीवाने नैसर्गिक घटकांत फेरफार करून उपकारक असे घटक निर्माण केलेले आढळतात. ‘वाघांची वस्ती’ असा शब्दप्रयोग केल्यास वाघांना जगण्यास आवश्यक घटक व वाघांचे तेथील वास्तव्य यांचा बोध होतो. सजीवाच्या स्वरूपाप्रमाणे ‘वस्ती’ ही संज्ञा व्यापक प्रदेश किंवा विशिष्ट छोटी जागा किंवा एखादा प्राणी दर्शविते. उदा., गोचिडीचा विचार करता बैल, गाय इ. प्राण्यांचे शरीर ही तिची ‘वस्ती’ असू शकते.
मनुष्यप्राण्याच्या संदर्भात ‘वस्ती’ हा शब्द मनुष्याच्या निवास प्रदेशाचा बोध करून देतो. ‘मनुष्यवस्ती’ ही संकल्पना अत्यंत व्यापक व अर्थगर्भ आहे. कारण येथे आपणास मनुष्य किंवा माणूस (मॅन किंवा मॅनकाइंड) व मानव (ह्यूमन बीइंग-ह्यूमनकाइंड)या शब्दांचे भिन्न अर्थ लक्षात घ्यावे लागतात. मनुष्य किंवा माणूस हे शब्द सामान्यतः ‘मनुष्य हा एक प्राणी (ॲनिमल) आहे’ या अर्थाने विचारात घेतले जातात. मनुष्यप्राणी हा जीव आहे (ऑर्गनिझम), त्यामुळे त्याच्या अस्तित्वासाठी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, अन्नादी घटक आवश्यक असतात. वस्तीचा विचार करताना या घटकांची उपलब्धता विचारात घ्यावी लागते. तसेच मनुष्यप्राणी हा एकाकी नाही त्याचा इतर जीवांशी साखळी संबंध आहे. विशेषतः अन्नासाठी तो अन्य सजीवांवर, वनस्पतींवर आणि प्राण्यांवर अवलंबून असतो. त्याची अन्नासाठी इतर प्राण्यांशी होणारी स्पर्धा व सहकार्य, अन्न साखळीत उद्भवणारे खंड यांचा मनुष्यवस्तीशी संबंध असतो.
मनुष्यप्राणी हा समूहशील प्राणी आहे. त्यामुळे तो समूहाच्या स्वरूपात वस्ती करणार हेसुद्धा ओघानेच येते. मनुष्यवस्तीचे प्राकृतिक घटक वैयक्तिक व सामूहिक पातळ्यांवर पाहणे व अंती जागतिक पातळीवर ‘पृथ्वी’ हे मानवाचे घर आहे या दृष्टीने वस्तीबाबतचे विचार मांडणे, हे मनुष्यवस्तीच्या दृष्टीने संयुक्तिक आहे.
मानववस्त्यांची कार्ये : मानववस्त्या पुढील कार्यासाठी निर्माण होतात :
(१) संरक्षण : मानव निवारा बांधतो. निवाऱ्यामुळे वस्ती निर्माण होते. मानवाला ऊन, थंडी, वारा, पाऊस आणि हिंस्त्र प्राणी व इतर आक्रमक मानवसमूह यांपासून संरक्षणाची गरज असते. ही गरज वस्ती भागविते. वस्तीमुळे मानवाला समूहशक्तीचे संरक्षण मिळते.
(२) विश्रांती : वस्ती मानवाला विश्रांतीचे, खाजगी जीवनासाठी स्थळ उपलब्ध करून देते.
(३) संपत्तीची साठवण : मानवाची वैयक्तिक व सामूहिक संपत्ती साठविण्याची सोय वस्तीमुळे होते. धान्य, मौल्यवान वस्तू, शेतीसाधने व नंतरच्या काळात सोने-नाणे इ. संपत्तिरूप वस्तू वस्तीमुळे साठविता येतात. त्या गरज असेल तेव्हा वापरता येतात.
(४) सामाजिक-सांस्कृतिक कार्ये : वस्तीमुळेच मानवाला कार्यक्षम असे सामाजिक संघटन करता येते. कुटुंब, समुदाय व उत्पादक संघटन, श्रमांचे विभाजन, कार्याचे संयोजन वस्तीत निर्माण होते. सांस्कृतिक घटक, कला, धर्म यांची अभिव्यक्ती व विकास वस्तीशिवाय अशक्य आहे. वस्तीत मानवाला अंतर्मुख होण्यास निवांतपणा मिळतो. वस्तीच्या आधारे तो चिंतनशील बनतो. वस्त्यांची जशी वाढ होते, त्या प्रमाणात त्या वस्त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक कार्य जास्त व्यापक व तरल होते. वरील कार्ये मूलभूत असून सूत्ररूपाने मांडली आहेत. आजच्या वस्त्यांची साधन-संपत्ती, निवासी सोयी, आर्थिक, राजकीय, व्यापारी, प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्यसेवा, मनोरंजनादी कार्ये वरील कार्यातूनच विकसित झाली आहेत.
मानववस्त्यांचे प्रकार : वस्त्यांचे कार्यानुसार दोन प्रकार आहेत : (१) ग्रामीण वस्त्या व (२) नागरी वस्त्या.
ग्रामीण वस्त्या : ग्रामीण वस्तीची नेमकी व्याख्या करता येत नाही, पण ज्या ठिकाणी बहुसंख्य लोक प्राथमिक व्यवसायांत गुंतलेले आहेत व जेथील लोकसंख्या विरळ आहे, अशा वस्तीला ‘ग्रामीण वस्ती’ असे म्हणता येते. ग्रामीण वस्तीवर कृषी, लाकूडतोड, खाणकाम, मासेमारी, पशुपालन यांसारखे व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या ७५ टक्क्यांंपेक्षा जास्त असते. घरे लहान, साधी, रस्ते अरुंद, कच्चे व इतर सोयी अल्प प्रमाणात असतात. ग्रामीण वस्तीचे स्वरूप देशाच्या प्रगतीनुसार बदलते. ग्रामीण वस्तीचे तीन प्रकार मानले जातात.
(अ) कुटिर वस्ती (पडळ) : जेव्हा एखाद-दुसऱ्या झोपडीची वस्ती असते, तेव्हा कुटिर वस्ती बनते. नैसर्गिक साधनसंपत्ती अत्यंत तुटपुंजी असते, तेव्हा एका कुटुंबाच्या निर्वाहाला विस्तीर्ण भूप्रदेशाची गरज भासते व तेथे कुटिर वस्ती निर्माण होते. डोंगराळ, गवताळ प्रदेशांत या वस्त्या आढळतात. बऱ्याच वेळा कुटिर वस्त्या सोडून दिलेल्या आढळतात.
(ब) वाडी (हॅम्लिट) :किमान पाच निवासस्थानांच्या वस्तीस वाडी म्हणावे, असा पाश्चात्त्य देशांत संकेत आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील संकेताप्रमाणे जेथे पाच घरे व दूरध्वनी असेल, अशा वस्तीला ‘वाडी’ म्हटले जाते. सामान्यतः वाडीतील कुटुंबे एकाच मूळ घरातील व नातेवाईक असतात. महाराष्ट्रात वाड्या तेथील बहुसंख्या कुटुंबांच्या आडनावांनी ओळखल्या जातात. जसे मोरेवाडी, शिंदेवाडी इत्यादी. वाडीत एखाद-दुसरे दुकान आढळते.
(क) खेडे : खेडे म्हणजे शासनाने अधिसूचित केलेली वस्ती होय. महाराष्ट्रात परंपरेने अधिसूचित केलेली खेडी आहेत तर नवीन वस्ती निर्माण झाल्यानंतर तेथील रहिवाशांनी आपली वस्ती खेडे म्हणून शासनाने अधिसूचित करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. तपासणीनंतर लोकसंख्या, शेतसारा-क्षेत्रफळ, जमिनीचा पोत व इतर शासकीय कसोट्या लावून खेडे अधिसूचित होते व त्याला मान्यता मिळते. हे नियम सर्वत्र सारखे नसतात. खेड्यात शेतीचे व अन्य प्राथमिक व्यवसायांचे प्राबल्य असते पण त्याचबरोबर काही अन्य सेवाही येथे उपलब्ध असतात. शिक्षण, दुकाने, लोहार, सुतार, डाक कार्यालय, दवाखाना, पाणवठा, रस्ते, ग्रामपंचायत, बॅंकेची शाखा, किरकोळ दुरुस्ती, पीठगिरणी या सुविधा सामान्यतः सर्वसाधारण खेड्यात आढळतात. मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या किंवा वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी आठवड्याचा बाजार विकसित होतो. त्याला अनुसरून केंद्रीय सेवा निर्माण होतात. कालांतराने आठवड्याच्या बाजाराच्या गावाचे ते वाहतूककेंद्र असल्यास ग्रामीण वस्तीचे नगरात रूपांतर होते.
नागरी वस्ती :नागरी वस्तीची शास्त्रीय व्याख्या नाही. शासनाने केलेली प्रशासकीय व्याख्या किंवा जनगणनेने केलेल्या व्याख्याच सर्वत्र वापरल्या जातात. नागरी वस्तीमध्ये बिगर-शेती व्यवसायात ७५% पेक्षा जास्त कामकरी लोकसंख्या गुंतलेली असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये २,५०० पेक्षा जास्त निवासी लोकसंख्या असणाऱ्या वस्तीला ‘नागरी वस्ती’ म्हणतात. भारतात जनगणना विभागाने १९६१ पासून नागरी प्रदेशासाठी खालील कसोट्या लागू केल्या आहेत :
(अ) जेथे नगरपरिषद, महानगरपालिका किंवा लष्करी कॅंटोनमेंट असेल अशा सर्व वस्त्या.
(ब) खालील अटी पूर्ण करणाऱ्या इतर सर्व वस्त्या :
१. किमान निवासी लोकसंख्या ५,००० किंवा जास्त
२. पुरुष कामकारी लोकांपैकी ७५% लोक बिगर-शेती उद्योगांत
३. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ४०० पेक्षा जास्त असावी.
वरील कसोट्या सार्वकालिक किंवा सर्वसमावेशक नाहीत. नागरी वस्ती ही मुख्यतः प्रक्रिया उद्योग करणारी व सेवा पुरविणारी असते. उदा., बाजार, व्यापार, बॅंक, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, करमणूक इत्यादी. [⟶ नगरे व महानगरे].
ग्रामीण वसतिस्थाने : ग्रामीण वस्तीचे स्थान निवडताना पुढील घटक विचारात घेतलेले आढळतात :
(१) पाण्याची सोय, पिण्यासाठी व इतर वापरासाठी कायम स्वरूपाचा पाणवठा, झरा, तलाव, नदी किंवा भूजल असेल, अशा ठिकाणी वस्तीचे स्थान निवडले जाते.
(२) भूमी : वस्तीसाठी निवडलेली भूमी सामान्यतः सपाट व घट्ट स्वरूपाची असते. शेतीच्या प्रदेशात वस्तीसाठी त्यांतल्या त्यांत नापीक किंवा खडकाळ असणारी भूमी वापरतात. काळ्या जमिनीत शेत व पांढऱ्या जमिनीत गाव, असे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळते.
(३) पुरापासून संरक्षण : नदीकाठी, किनारी भागात पुरामुळे किंवा समुद्राचे पाणी आत घुसून प्रदेश जलमय होण्याची शक्यता असते, म्हणून अशा प्रदेशात वस्तीची स्थाने अथवा गावठाणे उंचावर असतात.
(४) ऊन, वारा, पाऊस या दृष्टींनी निवारा : गावाचे स्थान निवडताना वाऱ्याची तसेच पावसाची दिशा यांचाही विचार केला जातो. उष्ण कटिबंधात पूर्वेस उतारावर, तर समशीतोष्ण कटिबंधात सूर्यासमोर दक्षिणेस उतारावर वस्त्या आढळतात. समुद्रकिनाऱ्यावर सागरी वाऱ्याच्या दिशेने उघडी स्थाने निवडली जातात तर दऱ्यांमध्ये दरी तळाऐवजी दरी उतारावर गावे वसतात.
(५) संरक्षण : जुनी गावे संरक्षणाच्या दृष्टीने सोयी-सुविधा असणाऱ्या ठिकाणी वसविली जातात. खिंडीमध्ये किंवा उंच डोंगरमाथ्यावर जेथून दूरवर टेहळणी करता येते, अशा ठिकाणी व गावाभोवती तट बांधता येईल, खंदक खोदता येईल, अशा ठिकाणी खेडी वसविली जात. गावाकडे जाण्याचा मार्ग हेतुतः दुर्गम राखला जाई. अनेक किल्ले याच दृष्टिकोनातून उभारलेले आढळतात.
(६) पूर्वनियोजित स्थान : जेव्हा नव्या प्रदेशाचा विकास करावयाचा किंवा खाणकामासारखे उद्योग सुरू करावयाचे असतात. तेव्हा उद्दिष्टपूर्तीचा विचार करूनच वस्तीचे स्थान निवडले जाते आणि त्याचे त्या दृष्टीने नियोजन केले जाते. पूर्व रशियातील गावे किंवा ऑस्ट्रेलिया, चिली या देशांतील खाणींची गावे नियोजित स्थानी आहेत.
ग्रामीण वस्तीची रचना : पाणी, रस्ते इ. सुविधांसाठी वस्तीच्या रचनेचा अभ्यास महत्त्वाचा असतो. गावातील घरांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, त्यावरून ग्रामीण वस्तीचे खालील प्रकार केले जातात.
(अ) एकत्रित किंवा केंद्रीभूत : जेव्हा वस्तीतील घरे एकमेकांस लागून अत्यंत जवळ असतात, तेव्हा केंद्रीभूत वस्ती निर्माण होते. महाराष्ट्राच्या ‘देश’ या भागातील वस्त्या याच प्रकारच्या आहेत. पाणीपुरवठा करणारा तलाव, गावप्रमुखाचे घर, मंदिर किंवा नाक्याचे स्थान या ठिकाणी किंवा सभोवताली सुपीक जमीन असल्यास वस्तीमध्ये कमीतकमी जमीन वापरली जावी म्हणून अशा वस्त्या निर्माण होतात. पायी प्रवास करण्यामुळेही केंद्रीभूत वस्त्या निर्माण होतात. विखुरलेली घरे चोरी, दरोडे या दृष्टींनी असुरक्षित असतात, म्हणूनही केंद्रीभूत वस्त्या निर्माण होतात.
केंद्रीभूत वस्त्यांचे उपप्रकार : (१) ताराकृती वस्ती : जेव्हा वस्ती रस्त्यांच्या नाक्यावर किंवा छेदन स्थानी निर्माण होते, किंवा केंद्रापासून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांस अनुसरून घरे बांधली जातात, तेव्हा ताराकृती वस्ती निर्माण होते.
(२) चौरसाकृती वस्ती : या वस्त्या नियोजनपूर्ण ग्रामीण वस्त्यांच्या प्रदेशांत आढळतात. उदा., अमेरिकेमध्ये जमिनीचे वाटप करताना ६५ हेक्टरांचे भाग पाडून वाटप करण्यात आले व चार शेते एकत्र येतील, त्या कोपऱ्यावर चौरसाकृती वस्ती करण्यात आली.
(ब) विखुरलेल्या वस्त्या : जेव्हा वस्तीमधील घरे स्वतंत्र व एकमेकांपासून दूर, सभोवती शेत किंवा मोकळी जागा असेल अशी आढळतात, तेव्हा या प्रकारची वस्ती बनते. उदा., कोकणात, हिमालय पर्वताच्या दऱ्यांमध्ये या प्रकारच्या वस्त्या आहेत. जास्त पाऊस, उंचसखल भूरचना व कमी उत्पादन जमीन यांमुळे हा रचना-प्रकार निर्माण होतो. बागायत प्रकारची फळबागांची शेती व पाण्याची सहज उपलब्धता यांमुळे शेतातच घरे बांधली जातात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हा रचना-प्रकार स्पष्ट दिसतो.
(क) रेखाकार वस्त्या : जेव्हा घरे रस्ता, नदी, समुद्र किनारा यांना अनुसरून समांतर रेषेत खूप अंतरापर्यंत बांधलेली असतात, तेव्हा हा प्रकार निर्माण होतो. जेव्हा शेत नदीपासून दूर पसरतात, तेव्हा पाणी घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास नदीकाठ हवा असतो किंवा समुद्रावर मासेमारीत प्रत्येक कोळ्यास जावयाचे असते. हे अंतर कमी करण्यासाठी या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात.
ग्रामीण वस्त्या सतत बदलणाऱ्या असतात, त्यांचे रचना-प्रकार कार्यानुसार, तंत्रज्ञानानुसार बदलतात. सुरक्षितता बदलल्यास रचनेमध्ये बदल होतो. आज पाण्याची सोय चांगली असेल मोटार वाहतूक सुरू झाली असेल, तर रचनाप्रकार केंद्रीभूत वस्तीऐवजी विखुरलेला किंवा रेखाकार बनू शकतो पण मूळ गावठाण मात्र तेथेच राहते. भूकंप, सतत येणारे पूर व दुष्काळ यांसारख्या आपत्ती आल्यास वस्ती उठते. उ. अमेरिकेमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण व मोटारींचा वापर यांमुळे अनेक ग्रामीण वस्त्या उठल्या लोक शहरांत गेले. जेथे सामान्यतः वस्त्यांमध्ये इमारती, रस्ते इ. मध्ये खूप गुंतवणूक असते, तेथील वस्त्या दीर्घकाळ टिकून राहतात.
नागरीकरण व ग्रामीण वस्त्या : नागरीकरण म्हणजे नगरात राहणाऱ्या लोकसंख्येत वाढ होणे. उदा., अधिकाधिक लोक शहरात स्थलांतरित होणे किंवा अनेक खेडी नगरे बनल्यामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होणे. जेव्हा आर्थिक विकास होतो व मध्यवर्ती खेड्यात व्यापार विकसित होतो एखादा साखर कारखाना खेड्यात स्थापन होतो व तेथे इतर छोटे उद्योग निर्माण होतात, दुकाने वाढतात शाळा-महाविद्यालये सुरू होतात बॅंका, कार्यालये स्थापन होतात, तेव्हा त्या खेड्याचे रूपांतर नगरात होते. अशा प्रकारे काही खेडी सतत नगरांत परिवर्तित होत असतात.
नगरांमध्ये रोजगार संधी जास्त उपलब्ध असतात, त्यामुळे ग्रामीण लोकसंख्येतील उत्साही युवक व धडाडीचे लोक यांचे शहरांकडे सतत स्थलांतर होते. ग्रामीण वस्त्यांमध्ये तरूण कामकऱ्यांची कमतरता भासते. खेड्यांत केवळ म्हातारे, स्त्रिया व मुलेच उरतात खेड्यांतील अनेक शेते ओसाड पडतात. कोकणात असा परिणाम ग्रामीण वस्त्यांवर झालेला दिसतो.
आज ग्रामीण वस्त्यांवर शहरांच्या, विशेषतः महानगरांजवळच्या भागांत, नागरीकरणाचे प्रभाव वेगळ्या प्रकारे कार्य करीत असलेले आढळतात. महानगरांमधील प्रचंड गर्दी, मुख्यतः न परवडणारे जमिनींचे मूल्य, प्रदूषण, अतिकृत्रिम यांत्रिक जीवन व मोटारींसारख्या खाजगी वाहनांची विपुलता यांमुळे अनेक शहरातील कुटुंबे महानगराजवळच्या खेड्यांत रहायला जातात. रस्ते, दूरध्वनी व ग्रामीण पाणीयोजना इ. मुळे आज अनेक खेड्यांत पुरेशा सुविधा आढळतात. शहरात रोज कामाला स्वतःच्या अगर सार्वजनिक वाहनांनी जाणारे, पण खेड्यात राहणारे लोक खेड्याला नगराचे बाह्यात्कारी रूप देतात. यालाच ‘ग्रामनागरीकरण’ म्हणतात. काही वेळा अशा खेड्यांस शयनगृह खेडी असेही म्हणतात. या खेड्यांत नागरी कार्ये मात्र आढळत नाहीत.
वस्ती भूगोल म्हणजे काय?
✅ Updated recently