वाङ्मयाचे वर्गीकरण
वाङ्मयाचे वर्गीकरण स्थूल मानाने ललित (फिक्शन) व ललितेतर (नॉनफिक्शन) अशा प्रकारांतही केले जाते :
(अ) ललित साहित्य : ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून निर्माण होते. त्याला वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील ह्यांचा पायाभूत आधार असला, तरी त्यातून साकारणारे अनुभवविश्व ही लेखकाची कल्पक निर्मिती असते. ललित साहित्याचे लेखन हे मूलतः व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पनानिर्मित म्हणजेच प्रतिभानिर्मित असते. सौंदर्यसिद्घीच्या तत्त्वांनुसार ते अवतरलेले असते. तदंतर्गत सुसंघटना ही प्रत्येक ललित साहित्यकृतिपरत्वे एक वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण सुसंघटना असते. काव्य, कथा, कादंबरी, नाटक हे ललित साहित्याचे प्रमुख प्रकार होत. ललित वा लघुनिबंध, नाट्यछटा आदी प्रकारांचाही उल्लेख करता येईल.
(आ) ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते. लेखकाच्या कल्पनाविलासाला त्यात अजिबात वाव नसतो. शब्द हेच माध्यम स्वीकारून विविध ज्ञानशाखांमधील ललितेतर वाङ्मय निर्माण होत असते. वैचारिक, शास्त्रीय, संशोधनपर, चर्चाचिकित्सात्मक, तत्त्वमीमांसक अशा विविध प्रकारच्या वाङ्मयाचा समावेश त्यात होतो. अर्थशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांवरील तसेच मानव्यविद्याविषयक ग्रंथ; भौतिकी, रसायनशास्त्र, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान इ. शास्त्रीय माहिती देणारे वा तत्संबंधी चर्चा करणारे ग्रंथ; संशोधनपर, वैचारिक लिखाण आदींचा अंतर्भाव ललितेतर वाङ्मयात केला जातो. हे वाङ्मय वस्तुनिष्ठ, बुद्घिप्रेरित, तर्क-अनुमानादींवर आधारित असल्याने त्याची सुसंघटना तर्काधिष्ठित व ठरीव ठशाची असते.
(इ) ललित व ललितेतर ह्यांच्या सीमारेषेवर मोडणारे लेखन: चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, चर्चात्मक गद्य, निबंध इ. प्रकारांचा समावेश ह्यात करता येईल. दोन्ही प्रकारच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये अशा लिखाणात एकवटलेली दिसतात. लेखकाच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचा ठसा, मांडणीकौशल्य, शैलीवैशिष्ट्ये इ. ललित स्वरूपाची; तर त्याच्या आशयातून प्रकटणारे विचार, माहितीपूर्णता, ज्ञानात्मकता इ. ललितेतर वैशिष्ट्ये निबंध, चरित्र आदी वाङ्मयप्रकारांतून आढळतात. त्यामुळे त्यांचा समावेश ललित व ललितेतर यांच्या सीमारेषेवरील लेखन, म्हणून करता येईल.
वाङ्मय व्यवहाराची किती मुख्य घटक आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.