१८५७ चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक) :

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’