श्रवण कौशल्याचे एकूण प्रकार किती?

कानाद्वारे विविध ध्वनी ऐकता येणे म्हणजे श्रवण नव्हे. तर श्रवण या क्रियेत ऐकणे, त्याचा अर्थ समजणे व समजलेल्या अर्थाविषयी स्वतःची प्रतिक्रिया निर्माण होणे, इत्यादी बाबींचा समावेश असतो. ऐकण्याची क्रिया कान या ज्ञानेंद्रियाकडून होते. कान आवाज ध्वनी ग्रहण करून मेंदूकडे पाठवतो. मेंदू त्या ध्वनींचे वर्गीकरण व विश्लेषण करून त्या ध्वनींना निश्चित अर्थ प्राप्त करून देतो. त्या प्राप्त झालेल्या अर्थाविषयीच्या प्रतिक्रिया मनात निर्माण होतात. या सर्व प्रक्रिया म्हणजेच श्रवण होय.


श्रवणाची अंगे:

श्रवण कौशल्य विकासांच्या सर्व अंगाचा विकास म्हणजेच श्रवण कौशल्याचा परिपूर्ण विकास होय. या अंगाचा विकास विद्यार्थ्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने होतो. श्रवण कौशल्य विकासाची अंगे पुढीलप्रमाणे आहेत

1. लक्षपूर्वक ऐकणे.
2. संदर्भ लक्षात घेऊन ऐकणे.
3. ध्वनींचे विश्लेषण करणे.
4. शब्दांचा परस्पर संबंध लक्षात घेणे.
5. शब्दसमूहाचा अर्थ लावणे.
6. मुख्य मुद्दे ग्रहण करणे.
7. वाच्यार्थ लक्ष्यार्थ व ध्वन्यार्थ ग्रहण करणे,
8. भाषा व शैली सामर्थ्य लक्षात घेऊन अर्थ ग्रहण करणे.
9. भाषेतील चुका व विशिष्ट सवयी लक्षात घेणे. 
10. ऐकलेल्या मजकुरानुसार विचारपूर्वक प्रतिसाद देणे.



कानावर सहज पडणारे ध्वनी म्हणजे ऐकणे तर विशिष्ट हेतूने लक्ष देऊन ऐकणे म्हणजे श्रवण. कान उघडे, पण विचार, मन दुसरीकडे असेल तर कानात काही शिरत नाही, म्हणजेच जे ऐकतो त्याचे आकलन होत नाही. एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक आवाज होत असतात, त्यातून आपणास हवे तेवढेच आवाज आपण ऐकतो, लक्षात ठेवतो.
शिक्षण प्रक्रियेत श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषा, समाजशास्त्र यांसारखे विषय आपण बव्हंशी श्रवणाद्वारे शिकतो. श्रवणाला दृक् माध्यमाची जोड असेल तर आकलन सोपे होते. खास करून गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांना ही गोष्ट लागू होते.
आंधळी कोशिंबीरसारखा खेळ ज्यात स्पर्शाने अथवा आवाजाने वस्तू, व्यक्ती ओळखल्या जातात, शाळा भरताना बाळगलेले मौन, यांतून श्रवण शक्ती विकसित होत असतात. आपल्या शिक्षणपद्धतीत जशी इयत्ता वाढते तसतसा व्याख्यान पद्धतीचा वापर वाढत जातो.

अध्ययनात श्रवणकौशल्यांचा उपयोग करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्या पुढे नमूद केल्या आहेत-
’जे ऐकले ते सारे लक्षात राहील असा आग्रह धरू नका.
’ नवा विषय, नवी माहिती, अवघड पाठ एकदा ऐकून लगेच समजेल असे नाही, हे ध्यानात घ्यावे.
’ पाठ ऐकायला सुरुवात करण्यासाठी आधी मनाची पूर्वतयारी करा. ताठ बसा, थकला असाल, मनात गोंधळ असेल तर लक्ष लागणार नाही. म्हणून व्याख्यान ऐकण्यापूर्वी शांत राहा.
’जो पाठ शिक्षक-प्राध्यापक शिकवणार आहेत, त्याची पूर्वतयारी करून जा.
’अभ्यासक्रमाबरोबर इतर व्याख्याने, चर्चासत्रे, कथा, कीर्तन, रेडियोवरील कार्यक्रम जरूर ऐका, जेणेकरून लक्षपूर्वक ऐकण्याची सवय जडेल तसेच तुमची ज्ञानकक्षाही रुंदावेल.
’आपण जे ऐकतो ते आपण आपल्या कळत-नकळत आपला गतानुभव, ज्ञान, माहितीशी जोडतो. त्यामुळे व श्रवण-वाचनाने समृद्ध होण्याचा प्रयत्न करा.
जे ऐकले त्याला लय किंवा ठेका असेल किंवा विषय तुमच्या आवडीचा, परिचयाचा असेल तर तो पटकन समजतो.
’शिकण्यादरम्यान तुम्ही जे ऐकत आहात, त्या संदर्भातील तुमचे पूर्वज्ञान, त्यांच्यातील साम्य-फरक शोधा, जे ऐकले त्याचे सार तुम्ही तुमच्या शब्दांत लिहून काढा. यामुळे त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील.
’जे ऐकले ते क्रमवार लक्षात राहण्यासाठी ऐकत असतानाच नोंदी करा. शब्दरूपाने अथवा सांकेतिक भाषेत, आकृतीच्या रूपात अथवा मोबाइलमध्ये रेकॉर्ड करता येईल.
’जे ऐकले ते सतत आठवत राहा. ते इतरांशी शेअर करा. त्यांच्याशी याबाबत चर्चा करा, म्हणजे ही ‘तात्पुरती जमा माहिती’ आपोआपच कायमस्वरूपी स्मरणशक्तीत रूपांतरित होईल.
’ऐकताना बोलणाऱ्याशी समरस व्हा. अनेकदा ऐकताना खास करून दमला असलात तर तुम्हाला झोप येऊ शकते. म्हणूनच वक्त्याकडे पाहा. श्रोत्याची सकारात्मक देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यांद्वारे साधला जाणारा संवाद वक्तयाला प्रोत्साहित करत असतात.
’एखादा मुद्दा पटला नाही, समजला नाही, तर त्याची नोंद करा. प्रथम स्वत: त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, अन्यथा वक्त्याला नम्रपणे विचारा.
’सतत हेडफोन लावून ऐकणे अथवा सतत मोठमोठय़ा आवाजाच्या ठिकाणी वावरणे यामुळे केवळ तुमच्या श्रवणशक्तीवरच विपरीत परिणाम करतात असे नाही, तर त्यातून तुमच्या कानाच्या पडद्याला इजा होते, डोकेदुखी जडते, स्मरणशक्ती कमी होते, नैराश्य येते.
’जितके दर्जेदार, वेगवेगळ्या धाटणीचे, विपुल ऐकाल तेवढे छान प्रकट वाचन करणारे व्हाल, उत्तम संवाद साधू शकाल. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांतील व्याख्याने, कथावाचन कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहा.



श्रवणाचे महत्त्व :

श्रवण ही भाषिक विकासाचची पहिली पायरी आहे. कारणा श्रवण या कौशल्याच्या विकासातून भाषण, वाचन व लेखन या कौशल्याचा क्रमाने विकास होतो. या चार कौशल्यांचा विकास म्हणजेच भाषिक विकास होय. त्यामुळे श्रवण हा भाषा विकासाचा पाया ठरतो. भाषा विकास अनुकरणावर अवलंबून असतो. पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावर मुलाला जे ऐकायला मिळते त्यातूनच त्याचा भाषा विकास होत असतो. कोणतीही भाषा अवगत होण्यासाठी ती सतत कानावर पडावी लागते. मुलाला भाषा ऐकायला मिळाली नाही तर तो बालू शकणार नाही, भाषा समजू शकणार नाही. लहान मुले जितक्या जास्त प्रमाणात ऐकतील तितक्या प्रमाणात त्यांची ग्रहणक्षमता व आकलन क्षमता वाढेल. त्यांच्या विचारशक्तीचा विकास होईल.