सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत. व्यवसायाचे स्वरूप, आकार व इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांवर संघटनेचे स्वरूप अवलंबून असते. उत्पादन किंवा व्यापार किंवा सेवा यांच्या स्वरूपानुसार व्यवसाय संघटनेचा प्रकार ठरतो.
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात. अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही. तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.
अंतर्गत संघटना :
कोणत्याही उद्योगव्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे अनेक व्यक्ती कार्य करीत असतात. या सर्वांचे काम मूळ उद्दिष्टांशी सुसंगत अशा रीतीने होणे आवश्यक असते. ज्या चौकटीत व्यक्तींना त्यांची कामे करावी लागतात त्या चौकटीला वा संरचनेला अंतर्गत संघटना असे म्हणतात. तिचे स्वरूप व्यवसायाचा आकार, उद्दिष्ट व कार्यप्रणाली ह्या गोष्टींवर अवलंबून असते. संघटनेच्या प्रचलित स्वरूपात खालील प्रकारांचा अंतर्भाव होतो.
रेखा किंवा सरळ उतरंड संघटना :
हा संघटनेचा सर्वसाधारण प्रकार असून तो लष्करी संघटनेच्या धर्तीवर राबविण्यात येतो. या प्रकारात व्यवसायाची कार्यप्रणाली विविध विभागांमध्ये विभागली जाते व प्रत्येक विभागाचा एक प्रमुख व्यवस्थापक असतो. त्याला त्याचे अधिकार वरिष्ठ व्यवस्थापकाकडून किंवा सरव्यवस्थापकाकडून मिळतात. सरव्यवस्थापन विभागीय व्यवस्थापक मुकादम कामगार अशी ही जबाबदारीच श्रेणी असते. हा संघटनेचा प्रकार सोपा व सुलभ असला, तरी विशेषीकरणाचा लाभ व विशेषज्ञांचा सल्ला या गोष्टींपासून ही संघटना वंचित राहते. त्यामुळे एकूण कार्यक्षमतेवर मऱ्यादा येतात.
कार्यात्मक संघटना :
अमेरिकन व्यवस्थापनतज्ज्ञ फ्रेडरिक विन्झ्लो टेलर (१८५६–१९१५) हा या संघटनाप्रकाराचा जनक होय. या प्रकारात सर्व पातळ्यांवर विशेषीकरण व श्रमविभाजन यांना महत्त्व दिलेले असते. या पद्धतीमध्ये आठ कार्यात्मक अधिकारी किंवा मुकादम नेमलेले असून त्यांना त्यांच्या विशेष गुणवत्तेनुसार कामे वाटून दिलेली असतात. प्रत्येक कर्मचारी या आठ मुकादमांना जबाबदार असतो व त्या सर्वांकडून कामाच्या संदर्भात त्याला सूचना मिळत असतात. विशेषज्ञांच्या सेवेचा चांगला उपयोग व विशेषीकरण हे फायदे या प्रकारात मिळत असले, तरी विशेषज्ञांच्या आदेशात संघर्ष होण्याची शक्यता व वरिष्ठ पातळीवर संयोजन करण्यात निर्माण होणारे अडथळे, हे या पद्धतीचे दोष म्हणता येतील.
रेखा तथा कार्यात्मक संघटना :
रेखा व कार्यात्मक संघटना या दोन्ही प्रकारांतील फायदे मिळावेत, या हेतूने हा प्रकार विकसित करण्यात आला. विशेषतः मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या संघटनेत रेखा-अधिकारी अंमलबजावणीकडे लक्ष देतात, तर तज्ज्ञ अधिकारी संशोधन व नियोजन विभाग सांभाळतात. तज्ज्ञ अधिकारी निर्णय घेतात व अंमलबजावणीचे काम साखळी-अधिकारी पाहतात. या संघटनेचे यश रेखा-अधिकारी व काऱ्यात्मक अधिकारी यांच्यातील परस्पर-सामंजस्यावर व सहकाऱ्यावर अवलंबून असते.
समिति-संघटना :
एखाद्या संघटनेपुढे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडक व्यक्तींचा गट अथवा समूह म्हणजे समिती होय. समिती-संघटना ही काऱ्यात्मक संघटनेचीच सुधारित आवृत्ती होय. समितीतील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचे व निर्णयाचे एकत्रित फायदे व्यवसायाला होऊ शकतात.
संघटन कार्यात किती टप्पे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.