पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात डॉ. दि. का. गर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील राजकीय विचारां’वर काही प्रबंध लिहिले गेले. त्यात लोकहितवादी, टिळक, सावरकर, न. चिं. केळकर इत्यादी विचारवंतांचा समावेश होता. मराठीत प्राध्यापक भास्कर भोळे यांनी या विषयावर एक व्यापक असा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे प्राध्यापक दि.का. गर्दे यांनी ‘आधुनिक भारतीय राज्यविचार’ हा ग्रंथ लिहिला. ही दोन्ही पुस्तके जरी पाठ्यपुस्तके म्हणून प्रकाशित झाली असली, तरी त्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची होती.

प्राध्यापक प्रकाश पवार यांनी आपल्या या नव्या पुस्तकातून पुन्हा एकदा या विषयाकडे आपले लक्ष वेधले आहे. या पुस्तकात एकूण सोळा लेखांचा समावेश आहे. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अपवाद वगळता बाकी सर्व विचारवंत महाराष्ट्रातील आहेत. तसे पाहिले तर आधुनिक भारतीय राजकीय विचारात मराठी विचारवंतांचे मोठेच योगदान आहे आणि ते किती आहे, हे या पुस्तकावरून कळते.

या पुस्तकात महात्मा फुले, वि. रा. शिंदे, राजारामशास्त्री भागवत, सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण आणि विशेषत: प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा परामर्श घेण्यात आला आहे. आणि हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

पारंपरिक राज्यशास्त्रज्ञ यांच्यातील बहुतेकांना राज्यशास्त्राचे विचारवंत मानणार नाहीत. कारण ते मुख्यतः समाजसुधारक होते आणि त्यांनी राजकीय प्रश्नांवर नाही तर सामाजिक प्रश्नांवर आपले विचार मांडले. पण प्रा. पवार यांचे असे मत दिसते की, हे विचारवंत सामाजिक प्रश्नांची बाजू मांडत असताना समता, सामाजिक न्याय, धार्मिक आणि सामाजिक बंधनातून मुक्ती याबाबतही आपली मते मांडत होते. त्यांची राजकीय बाजू पण मांडत होते. पण त्यांच्या मांडणीचा जास्त भर सामाजिक प्रश्नांवर विशेषत: सामाजिक न्यायावर होता.

भारताचा प्रबोधनाचा चळवळीत बंगालचा योगदानाची चर्चा केली जाते, पण महाराष्ट्राचे योगदान जास्त भरीव असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे महात्मा फुले, चिपळूणकर, राजवाडे, आगरकर, लोकहितवादी यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांनी आपले लिखाण मराठीत केले. त्यामुळे त्यांचे विचार बिगरमराठी भाषिक लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. पण न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोखले व काही प्रमाणात सावरकर यांनी इंग्रजी भाषेत लेखन केल्यामुळे त्यांची नोंद लवकर घेण्यात आली.