पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात:
(१) अजैविक, (२) जैविक.

(१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या प्रमाणात बदल झाल्यास त्याचा सजीवांच्या गणसंख्येवर विपरीत परिणाम होतो. सजीवाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये अजैविक घटकांचा परिणाम सहन करण्याची एक मर्यादा असते.

(२) जैविक घटकांत जीवावरणातील वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. जैविक घटकांच्या अन्न मिळविण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे उत्पादक, भक्षक व अपघटक अशा तीन गटांत वर्गीकरण केले जाते. हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोषी म्हणतात. अन्नभक्षणाच्या पद्धतीनुसार या भक्षकांचे तृणभक्षक, मांसभक्षक व सर्वभक्षक असे प्रकार खालीलप्रमाणे पडतात.