दुसऱ्या महायुद्धाचा भारतावर काय परिणाम झाला?

दुसरे महायुध्द व हिंदुस्थान : दुसऱ्या महायुध्दात हिंदुस्थानचा सहभाग सर्वदृष्टिने लक्षणीय होता. हिंदुस्थानचा स्वतंत्र्यलढा व स्वातंत्र्यप्राप्ती (१५ ऑगस्ट १९४७) या घटनांचा संबंध अप्रत्यक्षपणे हिंदी सैन्याचा सहभाग आणि आर्थिक साहाय्य यांच्याशी येतो. ⇨आझाद हिंद सेना ब्रिटिशांविरूध्द लढली तरीही स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात तिचा हातभार लागला होता. या सहभागाचा ठोकळ तपशील पुढीलप्रमाणे आहे : महायुध्दारंभीच्या व त्याच्या अखेर हिंदी संरक्षण सेनांचे संख्याबल किती होते, याचा तपशील ⇨भारत (संरक्षणव्यवस्था) या नोंदीत दिला आहे. भारतीय भूसेनेने उत्तर आफ्रिका, (ईजिप्तधरून) इराक, इराण, ईशान्य हिंदुस्थान, ग्रीस, ब्रह्मदेश व मलाया येथील युध्दांत लढाया मारल्या. युध्दोत्तर काळात मलाया, इंडोनेशिया व इंडोचायना येथील अस्तिर परिस्थितीला मार्गावर आणण्याची कामगिरी त्यांनी केली.

सैनिकांची प्राणहानी : या महायुध्दात झालेली भूसैनिकांची प्राणहानी इत्यादींच्या विवक्षित बाबी पुढीलप्रमाणे आहेत : मृत्यू : १५, २९१. जखमी : १०,३७१. युध्दबंदी : ७२,८५८. जपान विरूध्दच्या लढायांत, इतर लढायांपेक्षा सैनिकांची हानी (मृत्यू, जखमी, युध्दबंदी व बेपत्ता) फार मोठी झाली. ती अशी : (अ) मलाया : ६२,१७५ (सैनिक) (आ) ब्रह्मदेश : ४०,४५८ (सैनिक) (इ) इटली : २२,४९७ (सैनिक) (ई) ऊत्तर आफ्रिका १५,२४८ (सैनिक) (उ) सूदान व एरीट्रिया : ४,७८५ (सैनिक) (ऊ) इराक व इराण : ५४१ (सैनिक) (ए) ग्रीस : ३१४ (सैनिक).

समुद्रावर एकूण ४९९ सैनिक मृत्यू, जखमी व युध्दबंदी झाले. भारतीय वायुसेनेने आसाम व ब्रह्मदेश येथील लढायात भाग घेतला होता. तिच्या हानीची विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. भारतीय नौसेनेने प्रामुख्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कामगिरी केली. तिच्याही हानीची विश्वासार्ह माहिती मिळत नाही.

मान-सन्मान पारितोषिके : दुसऱ्या महायुध्दात हिंदी सैनिक व अधिकारी यांनी प्रशंसनीय मर्दुमकी गाजविली. अत्युच्च धैर्य व मर्दुमकीचे पदक (व्हिक्टोरिया क्रॉस) एकतीस सैनिकांना व अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले : (१) लेफ्टनंट परमिंदरसिंग भगत : ⇨मुंबई सॅपर्स व मायनर्स, ॲबिसिनिया, जानेवारी-फेब्रुवारी १९४१. (२) सुभेदार रिचपालराम (मरणोत्तर) : चौथी पलटण, राजपुताना रायफल्स, एरीट्रिया, फेब्रुवारी १९४१. (३) ले. क. कमिंग्ज : बारावी फ्राँटियर फोर्स रेजिमेंट, मलाया, जानेवारी १९४२. (४) हवालदार प्रकाशसिंग : पाचवी पलटण, आठवी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, जानेवारी १९४३. (५) सुभेदार लालबहाद्दूर थापा : दुसरी गुरखा रायफल्स, ट्युनिस, एप्रिल १९४३. (६) हवालदार-मेजर छेलुराम (मरणोत्तर): सहावी राजपुताना रायफल्स, ट्युनिशाया, एप्रिल १९४३. (७) हवालदार गजेघाले : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मे १९४३. (८) नाईक नन्दसिंग : अकरावी शीख रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४४. (९) जमादार अब्दुल हाफीज (मरणोत्तर) : नववी जाट रेजिमेंट, इंफाळ (हिंदुस्थान), एप्रिल १९४४. (१०) सैनिक कमलराम : आठवी पंजाब रेजिमेंट, इटली (कास्सीनॉ) मे १०४४. (११) कॅ. ऑलमंड. (१२) सैनिक गंजू लामा : इंफाळ, जून १९४४. (१३) सुभेदार तेजबहाद्दूर थापा (मरणोत्तर) : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१४) नाईक अगनसिंग राय : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१५) मेजर ब्लेकर : नववी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१६) नाईक यशवंत घाडगे (मरणोत्तर) : पाचवी मराठा लाइट इन्फंट्री, इटली, जुलै १९४४. (१७) सैनिक तुलबहाद्दूर पुनः सहावी गुरखा रायफल्स. ब्रह्मदेश, जून १९४४. (१८) सैनिक शेरबहाद्दूर थापा (मरणोत्तर) : नववी गुरखा रायफल्स, इटली, सप्टेंबर १९४४. (१९) सुभेदार रामसरूपसिंग (मरणोत्तर): ब्रह्मदेश, ऑक्टोबर १९४४. (२०) सैनिक थम गुरंग (मरणोत्तर) : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, नोव्हेंबर १९४४. (२१)सैनिक भंडारीराम: दहावी वलुच रेजिमेंट, इटली, नोव्हेंबर १९४४. (२२) हवालदार उमरावसिंग, तोफखाना, ब्रह्मदेश, डिसेंबर १९४४. (२३) लान्सनईक शेरशाह : सोळावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, जानेवारी १९४५. (२४) जमादार प्रकाशसिंग (मरणोत्तर) : तेरावी फ्राँटियर फोर्स रायफल्स ब्रह्मदेश फेब्रुवारी १९४५. (२५) नाईक ग्यानसिंग : पंधरावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२६) नाईक फझल दिन : दहावी बुलूच रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४४. (२७) सैनिक भाणभगत गुरंग : दुसरी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२८) ले. करमसिंग जज (मरणोत्तर) : पंधरावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२९) सैनिक नामदेव जाधव : पाचवी मराठा लाइट इन्फंट्री, इटली, एप्रिल १९४५. (३०) सैनिक अली हैदर : तेरावी फ्राँटियर फोर्स रायफल्स, इटली, एप्रिल १९४५. (३१) सैनिक लछमनसिंग गुरंग: आठवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मे १९४५ [⟶मानचिन्ह].

औद्योगिक व आर्थिक साहाय्य : हिंदुस्थानने या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या युध्दकार्याला भरीव साहाय्य केले होते किंबहुना आफ्रिका व आशियातील (पॅसिफिक महासागर युध्दक्षेत्र वगळून) सेनांना औद्योगिक उत्पादन, कपडालत्ता आणि जीवनोपयोगी सामग्री पुरविणारा हिंदुस्थान हा एकमेव तळ झाला होता. हिंदुस्थानातच आशियातील युध्दसंचालनाची प्रमूख कार्यालये होती. साहाय्याचा स्थूल आराखडा पुढीलप्रमाणे आहे : (१) लोखंडी व पोलादी तक्ते (सुरुंग, रणगाडे व जहाजांची दुरूस्ती) (२) पोलादी नळ (३) रेल्वेचे रस्ते बांधकाम-साहित्य वाफेची रेल्वे एंजिने, वाघिणी, रूळ (४)लाकूड (५)तारायंत्राचे खांब (६) लघु युध्दनौका व बोटी (७) अन्नधान्य, फळफळावळ इत्यादी (८) कपडालत्ता, तंबू, पादत्राणे (९) छत्रीधारी सैनिकांच्या छत्र्या (१०) चिलखती लढाऊ वाहने (११) औषधे (१२) रबर व रबरी माल (१३) तोफगोळ्याचे कोश (१४) तागाच्या वस्तू, स्पोटके व दारूगोळा.

युध्दसामग्रीच्या उत्पादनासाठी अनेक नवे कारखाने उभारण्यात येऊन त्यांतील उत्पादनाचा पुरवठाही करण्यात आला. 

या युध्दापायी रू. ४६.१८ कोटी (१९३८-३९) पासून रू. ३९७.२३ कोटी (१९४५) पर्यंत खर्च वाढला. ब्रह्मदेशातील युध्दासाठी अमेरिकेने सु. ५१५ कोटी रूपये हिंदुस्थान सरकारला (तत्कालीन ब्रिटिश सरकारला) उधार-उसनवारीच्या (लॅन्ड-लिज) स्वरूपात पुरविले होते तर अमेरिकेलाही हिंदुस्थानकडून अन्नधान्न, खाद्यपेये, निवास, कपडालत्ता, बंदरे-गोद्या इत्यादींच्या स्वरूपात परत साहाय्य (रू. १२५ कोटी) मिळाले होते. युध्दकाळात हिंदुस्थान सरकारने रू. ८३३ कोटी कर्ज उभारले. भारताला सु. आठ अब्ज स्टर्लिंग पौडांची रक्कम युध्दापोटी ब्रिटनकडून मिळाली होती.

राजकीय दृष्ट्या तत्कालीन भारतातील राष्ट्रीय नेत्यांना फॅसिस्ट व नाझी प्रणालीचा नायनाट करण्याचे महत्त्व, लोकशाही पाश्चात्त्य राष्ट्रांच्या व समाजवादी राष्ट्रांच्या नेत्यांप्रमाणे पटले होते त्यामुळे हिंदुस्थानाने युध्दात भाग घ्यावा म्हणून जवाहरलाल नेहरूंसारखे हिंदी नेते उत्सुक होते तथापी हा सहभाग देताना, हिंदुस्थानच्या राजकीय आकांक्षा व उद्दिष्टे तसेच हिंदुस्थानचे सहभागातील स्थान दोस्त राष्ट्रांच्या बरोबरीने असले पाहिजे, असा हिंदी नेत्यांचा आग्रह होता. दुर्दैवाने, ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांस हा आग्रह अमान्य होता. ९ ऑगस्ट १९४२ रोजी हिंदी नेत्यांना नजरबंद करण्यात आले. हिंदुस्थानला वॉशिंग्टन व लंडन युध्दसमितीत जरी स्थान देण्यात आले असले तरी युध्दकार्यनिर्देशनात मात्र हिंदुस्थानला वगळण्यातच आले होते. संपूर्ण हिंदीकरणास युध्दपूर्वकालात ब्रिटिश राज्यकर्ते मुळीच अनुकूल नव्हते तथापि वर वर्णिल्याप्रमाणे हिंदुस्थानचा संपूर्ण सहभाग−मनुष्यबळ, आथिक व औद्योगिक बाबी−यांतूनच हिंदी सेनांचे हिंदीकरण झाले व त्यातूनच आगामी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय संरक्षक सेनांचा पाया घातला गेला.






पहिल्या महायुध्दापेक्षाही, दुसऱ्या महायुध्दामुळे सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रांत झपाट्याने विकास झाला. वैज्ञानिक संशोधक व संशोधन यांवर राजकीय वर्चस्व व नियंत्रण प्रस्थापित झाले.

आगामी शतकातील घटनापटाची दिशा पुढील प्रसंगांना घालून दिली : (१) ब्रिटन व फ्रान्स यांचे जागतिक प्रभुत्व संपुष्टात येऊन, अमेरिका व रशिया यांचे प्रभुत्व आणि यांच्यातील चढाओढ सुरू झाली. वॉशिंग्टन व मास्को येथून आंतरराष्ट्रीय संबंध ठरू लागले. चीन व जपान ह्यांनाही महत्त्व आले. आशियायी जनतेने परत यूरोपीय राष्ट्रांच्या जोखडाखाली राहायला विरोध केला. काही काही राष्ट्रांना मुक्तीयुध्द लढावे लागले (उदा., इंडोनेशिया, इंडोचायना-व्हिएटनाम, अल्जीरिया इ.) तर काही राष्ट्रांची फाळणी झाल्यानंतर त्यांना स्वातंत्र मिळाले. उदा., भारत काही स्वतंत्र राष्ट्रे परतंत्र झाली उदा., लॅटव्हिया, एस्टोनिया व लिथ्युएनिया तर आफ्रिकेतील ईजिप्त, लिबिया, ट्युनिशिया इ. राष्ट्रे स्वतंत्र झाली तथापि त्यांच्यात कलह मात्र सुरू झाला. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली.