भांडवलशाहीचा आधार काय होता?
खाजगी मालमत्तेचा हक्क व वारसाहक्क हे भांडवलशाहीचे मोठे आधारस्तंभ आहेत. कारण त्यामुळेच उत्तरोत्तर संपत्तीचे अधिकाधिक केंद्रीकरण होऊ शकते.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या रचनेत मूलत : खालील गोष्टी अभिप्रेत आहेतः (१) या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकाची असतात. (२) उत्पादनविषयक सर्व निर्णय खाजगी भांडवलदार अनिर्बंध रीतीने घेऊ शकतात. (३) परचक्रापासून संरक्षण आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यांचे संस्थापन, एवढीच सरकारची मुख्य कार्ये असतात. सरकारने यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असा विचार समाजात प्रसृत असतो. (४) प्रत्येकाला आपले हित समजते व प्रत्येकजण आपले हित सांभाळण्याविषयी दक्ष असतो, म्हणून सर्वांना कराराचे मुक्त स्वातंत्र्य दिले की, होणारे करार हे उभयतांना योग्य असेच होतील. या कल्पनेमुळे या अर्थव्यवस्थेत कराराचे स्वातंत्र्य सर्वांना दिले जाते. (५) ग्राहक हा या अर्थव्यवस्थेत सार्वभौम असतो, असे सांगण्यात येते. ग्राहक आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची मागणी करतो. या मागणीचा व वस्तूंच्या पुरवठ्याचा ताळमेळ पडून बाजारात जी किंमत त्या वस्तूला मिळणे शक्य असेल, तीतून आपल्याला किती प्रमाणात नफा सुटण्याची शक्यता आहे, याचा विचार करुन खाजगी भांडवलदार आपला उत्पादनविषयक निर्णय घेत असतो. उत्पादनक्रियेवर यामुळे ग्राहकांच्या इच्छेचा मोठा प्रभाव राहतो. (६) 'नफा' हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कळसूत्र आहे. कोणते उत्पादन कधी, कोणत्या ठिकाणी, किती प्रमाणात करावे यांसारखे सर्व निर्णय भांडवलशाही अर्थव्यवस्था नफ्याच्या शक्याशक्यतेकडे नजर ठेवून करीत असते. हे नफ्याचे प्रमाणे खुल्या बाजारात ठरत असते. यामुळे या अर्थव्यवस्थेत उत्पादविषयक निर्णय आपोआप घेतले जात असतात, त्यासाठी शासनाच्या किंवा नियोजन आयोगाच्या मार्गदर्शनाची गरज लागत नाही. असंख्य वस्तूंचे उत्पादन कोणीही मध्यवर्ती केंद्रांतून निर्णय न घेता असे आपोआप होत रहावे, या घटनेचेच कित्येकांना इतके आश्चर्य वाटते की, त्यांना त्यात 'ईश्वराचा अदृश्य हात' असण्याचा साक्षात्कार झाला. (७) खाजगी मालमत्तेचा हक्क व वारसाहक्क हे भांडवलशाहीचे मोठे आधारस्तंभ आहेत. कारण त्यामुळेच उत्तरोत्तर संपत्तीचे अधिकाधिक केंद्रीकरण होऊ शकते.
या अर्थव्यवस्थेमुळे, पूर्वीच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत, एकूण उत्पादनात वाढ झाली यात शंकाच नाही. परंतु सर्व मानवांना अधिक सुखी करण्याच्या दृष्टीने तिचे कार्य अपुरे पडत आहे इतकेच नव्हे, तर ते विघातक ठरत आहे असे आढळून येऊ लागले. भांडवलशाहीच्या अगदी सुरुवातीच्या काळातही सहृदय डोळस विचारवंतांनी या अर्थव्यवस्थेत एका बाजूला वैभवशाली इमले रचले जातात, परंतु दुसऱ्या बाजूला असंख्य मानव हीनदीन अवस्थेत जगत असतात, हे दृश्य नीट निरखले होते. परंतु जसजसा काळ लोटू लागला तसतसा भांडवलशाहीच्या दोषांचा अधिकाधिक स्पष्ट असा अनुभव येऊ लागला व त्या अनुभवाची अधिक शास्त्रशुद्ध अशी उपपत्तीही लावली जाऊ लागली.
भांडवलशाहीत आढळून आलेले मुख्य दोष असे : (१) आर्थिक विषमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नफा अधिक मिळविण्याच्या प्रयत्नात भांडवलदार साहजिकच शक्य तितकी कमी मजुरी देत होते. रॉबर्ट ओएनसारखा एखादा अपवादात्मक भांडवलदारच अधिक उदार धोरणाचा पुरस्कार करीत होता. सरकारचे तटस्थ धोरण, मुक्त कराराच्या तत्त्वाचे अनुसरण व मजुर संघटनेच्या अभाव यांमुळे मजुरांचे हितसंरक्षण करण्याचा कोणताच मार्ग प्रारंभीच्या काळात उपलब्ध नव्हता. कामाचे तास, कामाची परिस्थिती, वेतनमान वा अन्य कोणत्याही बाबतींत काही नियम अस्तित्वात नव्हते, यामुळे अल्पसंख्य धनिक भांडवलदारवर्ग व बहुसंख्य शोषित कामगारवर्ग यांच्यामध्ये आर्थिक विषमतेची फार मोठी दरी निर्माण झाली होती. या वस्तुस्थितीच्या आधारावरच वर्गविग्रहाच्या स्फोटक विचारसरणीची मांडणी कार्ल मार्स्कने केली. (२) उत्पादनात वाढ करण्याची भांडवलशाही अर्थव्यवस्थेची क्षमता, हा तिचा पूर्वीच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करता एक महत्त्वाचा मोठा गुण होता. परंतु या कसोटीवरही भांडवलशाही अर्थव्यवस्था काही काळानंतर अपुरी पडते, असे आढळून येऊ लागले. तेजीमंदीच्या चक्रापासून भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला वाचवू शकत नाही, या चक्रपरिवर्तनाची अपरिहार्यता भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत रचनेत अनुस्थूत आहे आणि मंदीच्या काळात उत्पादन एकदम घटते व उत्पदनाला गती देण्याचा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा दावाही खोटा पडतो, अशी टीका भांडवलशाहीचे टीकाकार करु लागले. (३) उत्पादनात वाढ होत असतानाही ती समाजाला सर्वांत इष्ट अशा उत्पादनाच्या क्षेत्रातच होईल, अशी या अर्थव्यवस्थेची ग्वाही राहू शकत नव्हती. ग्राहक हा या अर्थव्यवस्थेत सार्वभौम आहे असे सांगितले जाते, परंतु हे सार्वभौमत्व त्याच्याकडे प्रत्यक्ष क्रयशक्ती जेवढ्या प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणातच अस्तित्वात असते. केवळ एखाद्याला गरज आहे म्हणून मागणी निर्माण होत नाही. त्या गरजेच्या माग पुरेशी क्रयशक्ती नसेल, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या गरजेची कोणतीच दखल घेत नाही. यामुळेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेत गरिबांच्या निकडीच्या गरजांच्या वस्तूंचे उत्पादन न होता धनिकांच्या चैनीच्या वस्तूंचे उत्पादन होऊ शकते. यामुळेच जनतेच्या महत्त्वाचा गरजा लक्षात घेऊन उत्पादनक्रम ठरवावा असे वाटत असेल, तर अनिर्बंध भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर विसंबून राहता येत नाही. (४) भांडवलशाहीला अभिप्रेत असलेल्या परस्परांतील स्पर्धेमुळे भांडवलदारांकडून ग्राहकांचे शोषण व्हावयाचे टळेल, ही अपेक्षाही फारच भाबडेपणाची ठरली. भांडवलशाहीत कधीकधी स्पर्धा फारच अतिरेकी, जाहिरात आदींवर भरमसाट खर्च करणारी व त्यामुळे सरतेशेवटी ग्राहकाला द्याव्या लागणाऱ्या अधिक किंमतीमुळे त्याचे नुकसान करणारी, अशी हानिकारक पद्धतीची होते, तर कधीकधी अशा जीवघेण्या (कट-थ्रोट) स्पर्धेतून इतर स्पर्धक हळूहळू नाहीसे होतात व शेवटी उरणारा स्पर्धक नंतर मक्तेदार बनून ग्राहकांचे शोषण करतो. या मार्गाखेरज अन्य मार्गानेही भांडवलशाहीत मक्तेदारीकडे वाटचाल करण्याची स्वाभाविक वृत्ती अस्तित्त्वात असते. कारण मक्तेदारी स्थापन झाल्यास युक्त नफ्याच्या प्रमाणाच्या पलीकडे जाऊन मक्तेदारीमुळे शक्य होणारा अतिरिक्त नफा मिळविता येतो. अशा मोठ्या मक्तेदाऱ्या अस्तित्वात आल्या की, त्या व्यवसायात नव्याने प्रवेश करणे अन्य कोणाला अशक्य होते व मुक्त व्यवसायसंधी (फ्री एंटरप्राइज) हा जो भांडवलशाहीचा एक विशेष गुण म्हणून सांगितला जातो, त्यालाही बाधा येते (५) मक्तेदारी स्थापना करुन नफ्याचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केल्यास नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन वाढीला चालना मिळते, या विधानालाही महत्त्वाचा अपवाद निर्माण होतो. उत्पादन कमी करुन जर अधिक नफा मिळविण्याती शक्यता असेल, तर भांडवलदार उत्पादनावर त्या दृष्टीने मर्यादा घातल्याखेरीज राहणार नाहीत. (६) भांडवलशाहीचा जसजसा विकास होत जातो, तसतशी ती साम्राज्यशाहीकडे झुकू लागते, असाही भांडवलशाही अर्थव्यवस्थेवरील एक मोठा आरोप आहे. या सिद्धांताचे विवेचन मार्क्स, लेनिन इत्यादींनी केले आहे. भांडवलदार मालाचे उत्पादन करतो, परंतु अधिक नफा मिळविण्याच्या हव्यासाने तो योग्य ती मजुरी देत नाही. यामुळे पुरेशी क्रयशक्ती समाजात वाटली जात नाही व परिणामी उत्पादन केलेला माल देशात खपणे अशक्य होऊन बसते. यामुळे भांडवलदार बाहेरच्या देशांतील बाजारपेठा शोधू लागतात. दूसऱ्या देशात अशी हुकमी बाजारपेठ हाताशी हवी असेल, तर त्या देशांवर राजकीय वर्चस्व असणे आवश्यक असते. अशा रितीने भांडवलशाही राष्ट्रे साम्राज्यशाहीकडे अपरिहार्यपणे वळतात, असे हे स्थूलमानाने विवेचन आहे. कच्च्या मालाचा निश्चित पुरवठा मिळविण्याच्या दृष्टीने व अतिरिक्त भांडवल किफायतशीरपणे गुंतविण्याच्या दृष्टीनेही साम्राज्ये उपयोगी असतात. आपल्या राष्ट्रात मजुरीचे दर वाढू लागले की, अंकित राष्ट्रांत कारखाने काढून तेथील मजुरांचे शोषण अधिक सुलभपणे करता येते. या सर्व दृष्टींनी भांडवलशाहीचा व साम्राज्याशाहीचा निकटचा संबंध आहे. पहिले महायुद्ध हे साम्राज्ये असणाऱ्या व साम्राज्य नसणाऱ्या प्रगत भांडवलशाही राष्ट्रांतील महायुद्ध होते. दुसरे महायुद्धही जर्मनी, जपान व इटली यांच्या साम्राज्ये मिळविण्याच्या लालसेतून आणि इंग्लंड व फ्रान्स यांच्या साम्राज्ये टिकविण्याच्या हव्यासातून निर्माण झाले होते.
भांडवलशाहीचा आधार काय होता?
✅ Updated recently