नाव
मुंबादेवीचे देऊळ.
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.[१] १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले. १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणाऱ्या मूळ कोळ जमातीच्या लोकांचे येथे वास्तव्य होते. आजही मुंबई शहरात कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य दिसून येते. मुंबई बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यापूर्वी १६६१ मध्ये इंग्लंडच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिचा हुंडा म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे दिली. १८ व्या शतकाच्या मध्यभागी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुनःप्राप्ती झाली व मुंबई हे एकच बेट झाले. माहीम काॅजवेमुळे वरळी वांद्रेला जोडले गेले, कुलाबा काॅजवेमुळे कुलाबा व छोटा कुलाबा मुख्य भूमीशी संलग्न झाले, हाॅर्नबी व्हेलार्डमुळे वरळी मलबार हिलशी जोडले गेले.

रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.


इतिहास
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.[ संदर्भ हवा ]

मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ]

जसे माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ.
Agrees, or Salt Cultivators of Salsette

आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[२]

मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ]

१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ]

पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.