वाङ्मयेतिहासाचे लेखन–
(१) वाङ्मयप्रकारांनुसार,
(२) लेखकांनुसार करता येते; किंवा ते
(३) वृत्तिप्रवृत्तींनुसार करता येते. कविता, कथा, कादंबरी इ. वाङ्मयप्रकारानुरूप वाङ्मयेतिहासलेखन करण्यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे सर्व वाङ्मयप्रकारांचा विकास एकसमयावच्छेदेकरून होत नाही. त्यामुळे स्वीकृत कालसीमांची ओढाताण होत राहते. आणखी अडचण म्हणजे अशा वाङ्मयेतिहासात एकाच वेळी अनेक वाङ्मयप्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकाच्या एकूण वाङ्मयीन योगदानाचे यथार्थ मूल्यमापन होत नाही. त्यामुळेच वाङ्मयेतिहासाचे वाङ्मयप्रकारनिष्ठ लेखन न करता लेखकनिष्ठ लेखन करावे असा एक पक्ष आहे. परंतु तेथे उलट प्रकारची म्हणजे वाङ्मयप्रकारांचा विकास जोखता न येण्याची अडचण येते. पण लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासलेखनातील आणखी वेगळी अडचण म्हणजे लेखकांचे आयुष्यकाल (आणि प्रत्यक्ष लेखनक्षम असण्याचे कालावधी) क्रमाने एका पाठोपाठ एक याप्रमाणेच सदैव येतील असे नाही. परिणामी त्यांचा ऐतिहासिक क्रम लावणे आणि त्यांचे एकमेकांवरील/पुढीलांवरील प्रभाव-परिणाम तपासणे अडचणीचे होते. वाङ्मयप्रकारनिष्ठ व लेखकनिष्ठ वाङ्मयेतिहासांपेक्षा वृत्तिप्रवृत्तींना केंद्रस्थानी ठेवून वाङ्मयेतिहास लिहिण्यात कमी अडचणी दिसतात. कारण वाङ्मयाच्या प्रवाहातील मुख्य धारा (मेन स्ट्रीम) येथे महत्त्व धारण करते. या मुख्य धारेच्या विचारात आणि तिला पूरक, समांतर आणि/किंवा विरोधी असणाऱ्या धारांच्या विचारात लेखक, वाङ्मयप्रकार, वाङ्मयीन घटिते (उदा., नियतकालिके, चळवळी, वाङ्मयीन वादविवाद, पारितोषिके इत्यादी) या सर्वांचीच व्यवस्था लावता येते. अशा वाङ्मयेतिहासात वाङ्मयकृतींच्या पार्श्वभागी असणाऱ्या सांस्कृतिक, राजकीय इ. सूत्रांनाही गुंफून घेता येते.
वाङ्मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात :
(१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात. वाङ्मयीन परंपराशोधनाचे किमान सूत्रही अशा वाङ्मयेतिहासामध्ये बाळगलेले नसते. वाङ्मयेतिहासकाराने आपली बहुतेक शक्ती सामग्रीचे संशोधन-संपादन आणि तिची कालनिश्चिती यांमध्येच खर्च केलेली असते. बहुतेक भाषांतील आरंभकालीन वाङ्मयेतिहास या प्रकारात मोडतात.
(२) यापुढील पायरी म्हणजे लेखक व त्यांच्या वाङ्मयकृती यांचा आणि वाङ्मयीन/सामाजिक घडामोडींचा काहीएक अनुबंध शोधण्याचा प्रयत्न असणारा वाङ्मयेतिहास. अशा अनुबंधशोधातही निश्चित दृष्टिकोण किंवा गृहीतके आणि त्यांच्या आधारे करावयाची चिकित्सा किंवा मूल्यमापन यांची अनुपस्थितीच असते. सामान्यतः विद्यापीठीय अभ्यासक्रमांना धरून लिहिलेले इतिहास या स्वरूपाचे असतात. अनेक लेखकांनी एका संपादकाच्या आधिपत्याखाली येऊन लिहिलेले वाङ्मयेतिहास याच प्रकारात मोडतात. अशा वाङ्मयेतिहासांना अनुबंधलक्ष्यी वाङ्मयेतिहास किंवा तार्किक प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्हिस्ट) वाङ्मयेतिहास असे संबोधिले जाते.
(३) वाङ्मयमूल्य हेच एक मूल्य केंद्रस्थानी ठेवून लिहावयाच्या वाङ्मयेतिहासाला कलालक्ष्यी किंवा सौंदर्यलक्ष्यी वाङ्मयेतिहास (एस्थेटिक लिटररी हिस्टरी) म्हणतात. अगोदर निर्देशित केलेल्या आर्. एस्. क्रेन यांची भूमिका अशा इतिहासामागे आहे.
(४) वाङ्मयाच्या निर्मितीला प्रत्यक्षाप्रत्यक्ष कारणीभूत होणाऱ्या समग्र सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय-आर्थिक इ. प्रेरणा-परंपरा-परिस्थितींचा विचार करून आणि एकूण समाजात उपलब्ध असणारी ‘व्यवस्था’ यांचा आणि वाङ्मयनिर्मितीचा मेळ घालून लिहिलेल्या वाङ्मयेतिहासाला समग्रलक्ष्यी (ऑर्गॅनिक) वाङ्मयेतिहास म्हणतात. सामान्यतः मार्क्सवादी व समाजवादी विचारसरणींचे विद्वान या प्रकारच्या वाङ्मयेतिहासलेखनाचा आग्रह धरताना दिसतात.
वांग्मय इतिहास लेखनाचे किती प्रकार पडतात?
✅ Updated recently