दुसरा कालखंड (१८८५-१९२०)

केशवसुतांची अर्वाचीन, आत्मपर, अशी कविता ह्या कालखंडात प्रभावीपणे रसिकांपुढे आली मराठी कवितेला आत्मपरता सर्वस्वी नवी होती, असे नव्हे. नामदेव तुकारामांसारख्या संतकवीच्या कवितेत ती होतीच; परंतु भक्ती हे त्या कवितेचे अधिष्ठान होते. लौकिक विषयासंबंधीच्या कवीच्या भावना कवितेत निबद्ध करण्याची प्रवृत्ती हे अर्वाचीन कवितेच निराळेपण होते; तिची पूर्वचिन्हे महाजनी, कानिटकर ह्यांसारख्या कवींच्या कवितेतून दिसू लागली आणि पुढे केशवसुतांच्या कवितेत ती तीव्रतेने व्यक्त होऊ लागली. कवीचे वैयक्तिक जीवन, त्याची स्वतःची सुखदुःखे, समकालीन सामाजिक प्रश्नांबाबतची त्याची प्रतिक्रिया, त्याचे एकंदर जीवनविषयक तत्वज्ञान ह्यांना काव्यात स्थान मिळू लागले. काव्य हे आत्माविष्कारासाठी आहे, ही कल्पना मान्य होऊन काव्याचे प्रयोजन, विषय, दृष्टिकोण आणि बाह्य स्वरूप ह्यांत परिवर्तन घडून आले. व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्री-पुरुषांमधील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी, गूढानुभूती अशा विविध विषयांवरील भावाविष्कार केशवसुतांच्या कवितेत आढळतो. चिंतनशील आविष्कारास अनुकूल असा सुनीत (सॉनेट) हा पश्चिमी काव्यप्रकारही त्यांनीच मराठीत रूढ केला. कवितेला आपण नवा दृष्टिकोण देत आहोत आणि नवी काव्याभिरुची निर्माण करीत आहोत, ह्याची जाणीव केशवसुतांच्या ठायी होती. कवीची थोरवी, त्याच्या स्फूर्तीचे स्वरूप, कवितेचे प्रयोजन ह्यांसारख्या विषयावर त्यांनी केलेली काव्यरचना हे स्पष्टपणे दर्शविते.

केशवसुतांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला, अशा कवींत ना.वा. टिळक (१८६१-१९१९), राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज (१८८५-१९१९), बालकवी (१८९०-१९१८), बी (१८७२-१९४७), माधवानुज (१८७२-१९१६), एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (१८८७-१९२०), नरहर शंकर रहाळकर (१८८२-१९५७), नागेश गणेश नवरे, ह्यांचा समावेश होतो.

ना. वा. टिळक ह्यांनी केशवसुतांच्या आधी काव्यरचनेस प्रारंभ केला होता. त्या वेळी त्यांची काव्यरचना जुन्या पद्धतीची आणि दीर्घ कथनपर अशी होती. तथापि केशवसुतांची कविता अवतरल्यानंतर ते नव्या वळणाची कविता लिहू लागले. गोविंदाग्रज स्वतःला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवीत. केशवसुतांच्या ‘तुतारी’ च्या प्रभावातून त्यांची ‘दसरा’ ही कविता त्यांनी लिहिली. तथापि गोविंदाग्रजांचा पिंड केशवसुतांपेक्षा भिन्न होता. विलक्षण कल्पनाशक्ती, अत्युत्कट भावना आणि त्यांना पेलणारी समर्थ शब्दकळा ह्यांनी गोविंदाग्रजांच्या कवितेला तिचे एक खास रूप दिले आहे. गोविंदाग्रजांनी तात्विक गूढगुंजनात्मक, आध्यात्मिक, सामाजिक, अशा विविध विषयांवर कविता लिहिली असली, तरी प्रीतीचा–विशेषत: विफल प्रीतीचा–प्रभावी आविष्कार त्यांच्या अनेक कवितांतून त्यांनी घडविला आहे. बालकवींनी केशवसुतांच्या संस्कारांतून ‘धर्मवीर’ ही कविता लिहिली. तथापि त्यांची मूळ वृत्ती निसर्गकवीची असल्यामुळे ‘धर्मवीर ’ सारख्या त्यांच्या कविता यशस्वी झाल्या नाहीत. त्यांच्या निसर्गकवितेने मात्र एक वेगळी संवेदनशीलता आधुनिक मराठी कवितेत आणली.

केशवसुतांच्या कवितेने गोविंदाग्रज आणि बालकवी हे दोघेही प्रभावित झालेले असले आणि केशवसुतांचे अनुकरण करण्याचा काही प्रयत्नही त्यांनी केला असला, तरी ते स्वतंत्रपणे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी होते. गोविंदाग्रजांची प्रेमकविता आणि बालकवींची निसर्गकविता मराठी कवितेला नवीन वळण लावणारी होती. कवी ‘बी’ ह्यांची कविता विचारपरिप्लुत असून तिला अध्यात्माचेही अंग आहे. डंका’ सारख्या त्यांच्या कवितांतून येणाऱ्या बंडखोर विचारांमुळे ते केशवसुतांच्या जवळ जातात. माधवानुजांनी केशवसुतांच्या अनुकरणाने सुनीतरचनेचा प्रयत्न केला. केशवसुतांचे स्मरण होईल, अशा ओळी काही वेळा ते लिहून जातात.

तथापि त्यांच्या कवितेचे विषय मऱ्यादित आहे आणि त्यांच्या हाताळणीत फारशी सखोलता नाही. रेंदाळकरांनीही आपल्या परीने केशवसुतांची साथ केली ; तथापि त्यांचीही अनुभवकक्षा लहान होती आणि केशवसुती कवितेचा जोम त्यांच्या कवितेत नव्हता. संस्कृतप्रमाणेच मराठी कविताही निर्यमक लिहिण्याचा त्यांनी केलेला जोरदार पुरस्कार मात्र उल्लेखनीय होय. रहाळकरांनी केशवसुती कवितेचे विषय घेतले; जातिवृत्ते स्वीकारली. तथापि अनुकरणाच्या पलीकडे ते जाऊ शकले नाहीत, असे त्यांची पुष्पांजली (१९२३) पाहिल्यावर दिसते. काव्यलेखनाच्या मूळच्या जुन्या वळणापलीकडे जाऊन नवे आत्मसात करण्याची धडपड नागेश गणेश नवरे ह्यांच्या कवितेत जाणवते. कवितेचे नवे वळण स्वीकारण्याची प्रवृत्ती दत्तांच्या (१८७५-९९) ठायी होती; परंतु त्यांच्या कवितेने पूर्ण आकार घेण्याच्या आतच त्यांचे अकाली निधन झाले.

कवी सुमंत (१८८१-१९३९) ह्यांच्या कवितेत नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारांच्या कवितांची वळणे दिसून येतात. बळवंत जनार्दन करंदीकर ह्यांची कविता भावगीताकडे झुकलेली आहे.

केशवसुती कवितेने निर्माण केलेल्या वातावरणात राहूनही काही कवी जुन्या, पारंपारिक काव्यरचनेतच रमले होते.अशा कवींत विठ्ठल भगवंत लेंभे (१८५०-१९२०), गणेश जनार्दन आगाशे (१८५२-१९१९), कृ. ना. आठल्ये (१८५२-१९२३), मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०), पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी, (१८५६-१९३०), गंगाधर रामचंद्र मोगरे (१८५७-१९१५), वासुदेवशास्त्री खरे (१८५८-१९२४), विद्याधर वामन भिडे (१८६१-१९३६), एकनाथ गणेश भांडारे (१८६३-१९११), लक्ष्मण गणेश लेले (१८७०-१९३२,), बाळकृष्ण अनंत भिडे (१८७४-१९२९), अनंततनय (१८७९-१९२९), राधारमण (१८७७-१९२७), साधुदास (१८८४-१९४८) ह्यांचा समावेश होतो. बोधवादी प्रव-त्ती, भक्तीकडे आणि अध्यात्माकडे ओढ, ऐतिहासिक विभूतींचा गौरव, प्रासंगिक-तात्कालिक विषयांची हाताळणी ही ह्या कवींच्या काव्यरचनेची काही सर्वसाधारण वैशिष्ट्ये होत. ह्या कवींपैकी गंगाधर रामचंद्र मोगरे ह्यांनी मराठी कवितेत उपरोधप्रचुर कवितेचा प्रकार आणला, हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य होय. केशवसुतांनी मराठी कवितेत क्रांती केलेली नसून त्यांची कविता म्हणजे मराठी कवितेच्या उत्क्रांतीचा एक टप्पा होय, अशा आशयाचे विचार बाळकृष्ण अनंत भिडे यांनी व्यक्त केले होते.

कवी चंद्रशेखर (१८७१-१९३७) पंडिती कवितेचे अर्वाचीन काळातील एक श्रेष्ठ प्रतिनिधी होत. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, ही त्यांची काव्यविषयक भूमिका होती. तसेच कवितेतील आत्मपरताही त्यांना मान्य नव्हती. लक्ष्मीबाई टिळक (१८६८ ? – १९३६) ह्या या कालखंडातील एक उल्लेखनीय कवयित्री होत. संसारातील सुखदु:खांचा आविष्कार साध्यासुध्या पण प्रत्ययकारी भाषेत त्यांनी केला. त्यांचे पती नारायण वामन टिळक ह्यांच्या, ख्रिस्तायन ह्या अपुऱ्यान राहिलेल्या प्रदीर्घ काव्याचा बहुतांश भाग लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला. दीर्घ आख्यानक कविता रचणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत. बहिणाबाई चौधरी (१८८०-१९५१) ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. माहेर, संसार, कृषिजीवनातील विविध प्रसंग असे विषय बहिणाबाईंच्या कवितेचे आहेत. सहजोद्गारांसारख्या साध्यासुध्या भाषेत रचिलेल्या ह्या कवितेतील अनेक ओळींना सुभाषितांची योग्यता प्राप्त झाली आहे.

अर्वाचीन मराठीतील राष्ट्रीय कवितेचा ठळक प्रवाह कवी विनायक (१८७३-१९०९) ह्यांच्यापासून सुरू झाला, अहल्या, संयोगिता, पद्मिनी इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर सुंदर काव्ये त्यांनी लिहिली. हतभागिनी’, ‘मातृभक्तीचे लेणे’, ‘जन्मसार्थक्य’ ह्यांसारख्या त्यांच्या कविताही ह्या संदर्भात लक्षणीय ठरतात. ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ ह्यांसारख्या त्यांच्या ओळी सुभाषितत्व पावल्या आहेत. विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६) ह्यांनी लिहिलेली राष्ट्रप्रेमाची कविता ज्वलन्त आणि क्रांतिकारक आहे. ‘स्वतंत्रता भगवती’ अशीच ही कविता आहे. उत्कट देशभक्ती, दुर्दम्य स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याकांक्षा आणि उत्तुंग कल्पकता ह्यांच्या संयोगातून फुलून आलेले सावरकरांचे कवित्व अनन्यसाधारण असे आहे. कवी गोविंद (१८७४-१९२६) ह्यांनी ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर कविता लिहिल्या.

‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हे त्यांचे स्फूर्तिदायक गीत सर्वपरिचित आहे. मृत्युचे स्वागत करणाऱ्या एका उदात्त मनाचा आविष्कार त्यांच्या ‘सुंदर मी होणार ’ ह्या कवितेत आढळतो. दु.आ. तिवारी ह्यांची मराठ्यांचा इतिहास गाणारी ओजस्वी संग्रामगीते, ‘कुंजविहारी’ (हरिहर गुरुनाथ सलगरकर) ह्यांची ओजोत्कट राष्ट्रगीते, ऐतिहासिक चित्रपटसंग्रहच वाटावा अशी कवी ‘अज्ञातवासी’ (दिनकर गंगाधर केळकर) ह्यांची कविता हे सर्व अर्वाचीन मराठीतील राष्ट्रीय कवितेचे महत्वाचे संचित होय. स्थूलमानाने पाहता पूर्वजांचे यशोगान राष्ट्रीय स्वातंत्र्याऱ्याऱ्याऱ्याचा उदघोष आणि राष्ट्रोन्नतीस पोषक अशा विधायक मूल्यांचा पुरस्कार ह्या त्रिसूत्रीवर ही कविता उभी असलेली दिसते.

ह्या कालखंडातील काही कवींच्या विलापिकांतून वैयक्तिक दु:खांचा आविष्कार झालेला आहे. विठ्ठल भगवंत लेंभे (‘शोकावर्त’); गणेश जनार्दन आगाशे (‘बाष्पांजली’), सुमंत (‘शोकतरंगिणी’), ना.के. बेहरे (‘स्मरणी’) हे ह्या विलापिकांचे कवी होत. निरनिराळ्या क्षेत्रांतील थोर व्यक्तींवरही विलापिका लिहिल्या गेल्या.

महाराष्ट्राबाहेर राहून मराठी कविता लिहिणारे भास्कर रामचंद्र तांबे (१८७३-१९४१) ह्यांची निखळ कलामूल्यांचा पाठपुरावा करणारी कविता ह्याच कालखंडातली. तांबे ह्यांच्या कवितेवरील संस्कार वैविध्यपूर्ण आहेत. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवी, टेनिसन-ब्राऊनिंग हे नंतरचे कवी, रवींद्रनाथ टागोर आणि संस्कृत कवी जयदेव अशा विविध कवींचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो. केशवसुतांच्या प्रभावापासून अलिप्त राहिलेले कवी म्हणूनही ते उल्लेखनीय ठरतात.