समाजशास्त्र ' ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली; तथापि तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो.

मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. ‘ समाजशास्त्र ’ ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली; तथापि तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो. समाजशास्त्रीय विचारांची मुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जाऊन पोहोचतात. सेंट सायमन (१७६०-१८२७) याने प्रथमत: समाजाचा अभ्यास शास्त्राच्या पातळीवर नेण्याची आवश्यकता प्रतिपादिली. प्रबोधनकाळ आणि तद्नुषंगाने नव्याने पुढे आलेले विचार, तत्कालीन सामाजिक प्रकिया, चळवळी या सर्वांनी समाजशास्त्राच्या प्रगतीला मोठी प्रेरणा दिली. त्याकाळच्या परिस्थितीवरील प्रतिकिया म्हणून अनुभववाद पुढे आला. ऑग्यूस्त काँत याने समाजशास्त्राचे नामकरण केले आणि समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धत वापरण्यावर भर दिला. तत्कालीन समाजरचना हा सामाजिक उत्कांतीच्या विकासाचा उच्च्बिंदू असल्याने कांतिकारक बदल अनावश्यक आहेत, असे त्याचे मत होते. त्याने समाजशास्त्राचा अभ्यास हा प्रत्यक्ष सत्तावादाच्या भूमिकेतून करावयास पाहिजे असे प्रतिपादिले. त्याच्या मते समाजशास्त्रसुद्धा इतर शास्त्रांसारखे निश्र्चित स्वरूपाचे करता येईल.