वर्गव्यवस्था म्हणजे काय?

सामाजिक स्तरीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या एकाच स्तरावरील समान सामाजिक स्थानांच्या लोकांना संघशः सामाजिक वर्ग असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. समाजातील हे स्तर उच्च–नीच या कल्पनेतून निर्माण झालेले असतात. व्यक्तीला सामाजिक स्थानपरत्वे समाजाकडून मिळणारी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या त्रिविध मोबदल्याच्या भेदात्मक प्रमाणामुळे समाजातील सर्वच व्यक्तींची विभागणी कोणत्या तरी एका वर्गात होते. अशा रीतीने एखाद्या व्यक्तीला अगर व्यक्तिसमूहाला मिळणारा वर्ग हा इतर वर्गांच्या संदर्भातच निश्चित होतो. म्हणून या वर्गवारीच्या प्रक्रियेला ‘वर्गव्यवस्था’ असे म्हणणे क्र मप्राप्त ठरते.

एकाच वर्गातील लोकांना परस्परांबद्दल समतेची भावना असते; परंतु इतरांबद्दल मात्र अमुक वर्ग खालचा, अमुक वर्ग वरचा अशी त्यांची भूमिका असते. रोटी–बेटी व्यवहारामध्ये हा भेद तीवपणे जाणवतो. एकाच वर्गातील लोकांच्या आर्थिक दर्जापेक्षाही त्यांच्या अभिवृत्ती, अभिरुची, जीवनमूल्ये, राहणीमान व जीवनपद्घत सारखीच असते, हे महत्त्वाचे आहे. समाजात एकूण असे किती वर्ग असतात, याबद्दल भिन्न मते प्रचलित आहेत. ⇨ॲरिस्टॉटलने अतिश्रीमंत, गरीब आणि मध्यम असे तीन वर्ग असतात, असे म्हटले होते.

ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ⇨ॲडम स्मिथ याने समाजात कुळाकडून मिळणाऱ्या भुईभाड्यावर जगणारे, मजुरीवर जगणारे आणि व्यापारी नफ्यावर जगणारे असे तीन वर्ग असतात, असे म्हटले आहे. ⇨थॉर्स्टाइन व्हेब्लेन (१८५७–१९२९) या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने जगण्याकरिता परिश्रम कराव्या लागणाऱ्या मजुरांचा आणि रिकामा वेळ भरपूर असलेल्या ऐषारामी लोकांचा असे दोनच वर्ग असतात असे म्हटले आहे. हा ऐषारामी वर्ग दिखाऊ अगर प्रदर्शनी उपभोगामुळे इतरांपासून अलग पडतो. ⇨माक्स वेबरप्रणीत वर्गविभाजनाचे तत्त्व काही बाबतींत मार्क्सच्या तत्त्वांशी मिळतेजुळते आहे.

विपुल संपत्ती व संपत्तीचा अभाव हेच वर्गाचे मूळ घटक आहेत असे वेबर म्हणतो.भांडवलशाही समाजात मालमत्ताधारी उच्च वर्ग, मालमत्ता नसणारा पांढरेपशा कामगारांचा वर्ग, छोटे भांडवलदार आणि मजूर वर्ग असे चार प्रमुख वर्ग असतात असे त्याने म्हटले आहे. वरील वर्गवारीमध्ये सर्वांनी पैशाला, धनसंपत्तीला महत्त्व दिले आहे असे दिसते; परंतु सामाजिक वर्ग हे केवळ पैशावर अवलंबून नसतात.

एका वर्गाच्या सदस्यांची विचारसरणी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व सांस्कृतिक पातळी सारखीच असते. जवळ केवळ पैसा असणे याला महत्त्व नसून, तो पैसा कसा मिळविलेला आहे, समाजमान्य व वैध मार्गाने मिळविलेला आहे का नाही आणि त्या पैशाचा विनियोग कसा केला जातो, याचेही मूल्यमापन समाजाकडून होत असते आणि त्यानुसार व्यक्तींना दर्जा मिळतो. अशा रीतीने सामाजिक वर्ग म्हणजे, समान दर्जा व समान शील असलेल्या लोकांचा गट बनतो. एका वर्गातील लोकांमध्ये परस्परांबद्दल आपुलकीची भावना असते.

एकूण किती वर्ग समाजात आहेत, हे आपण निवडलेल्या निकषांवर अवलंबून असते. सामान्यतः उच्च, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन वर्ग मानणे ही पूर्वापार चालत आलेली पद्घत होय. लॉयड वॉर्नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९४१–४२ दरम्यान अमेरिकेतील एका शहरातील सामाजिक जीवनाच्या पाहणीचे विश्लेषण करताना सहा वर्गांची कल्पना मांडली. यानुसार अत्युच्च, निम्न–उच्च, उच्च–मध्यम, निम्न–मध्यम, अतिकनिष्ठ आणि कनिष्ठ असे सहा वर्ग कल्पिण्यात आले. अत्युच्च वर्गात समाजातील प्रतिष्ठित, धनिक आणि अनेक पिढ्यांपासून समाजाचा भाग बनलेल्या कुटुंबांचा समावेश करण्यात आला. निम्न–उच्च म्हणून गणल्या गेलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या वर्गात, बहुधा अत्युच्चां इतकीच श्रीमंत कुटुंबे होती; परंतु तुलनेने हा वर्ग नव–श्रीमंतांचा होता आणि तो तितकासा प्रतिष्ठितही मानला जात नव्हता.