सामाजिक सुरक्षा ( सोशल सिक्युरिटी ) :
व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतातत्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढतेत्या संकटांना तोंड देणे कठीण जाते. फार पूर्वी व्यक्ती व त्याचे कुटुंब स्वतःच आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी वाहत असे स्थानिक समूह किंवा चर्च हे काही प्रमाणात मदतीचा हात देत. हळुहळू अधिक संघटित संस्थांद्वारे मदत देण्याची पद्घत विकसित झाली. भूतदया, मानवता, अहिंसा, शांतता आणि करुणा ही मूल्येही कुटुंबाने दुःखी आणि पीडित व्यक्तींना साहाय्य करण्यासाठीच बालपणापासून व्यक्तीच्या मनावर बिंबविलेली असत. माणसाने सुरूवातीपासूनच आर्थिक सुरक्षितता संपादण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. सर्वांनी आनंदी व सुखी जीवन व्यतीत करावे असे मानवी प्रयत्न असत. ‘सर्व माणसे सुखी असावीत’ अशा संस्कारामागे सर्व माणसे सुरक्षित असावीत असेच अभिप्रेत असते. त्याकाळी निसर्गाची कृपा असेपर्यंत सर्व काही सुरळीत चालत असे; परंतु निसर्गाची अवकृपा झाली आणि महापूर, भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ इ. आपत्ती आल्या; तर माणसे मृत्यूमुखी पडत, अपंग होत, निराधार होत. अशा वेळी माणसे आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचून जात. ज्यावेळी आर्थिक आपत्तींना तोंड देणे व्यक्ती वा कुटुंबालाही कठीण जाई, त्यावेळी माणसे कुटुंबाबाहेरील समूह आणि समाजाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहू लागतात, यातूनच ‘सामाजिक सुरक्षा’ ही संकल्पना प्रसृत झाली आणि प्रत्यक्ष कृतीत अवतरली.
सतराव्या-अठराव्या शतकांत औद्योगिक क्रां तीने यूरोप खंडात सामाजिक सुरक्षा या संकल्पनेस चालना दिली. अनेक लोक चरितार्थासाठी शहरांकडे आकृष्ट झाले आणि कारखान्यांतून काम करू लागले. त्यावेळी कारखान्यांमधील स्थिती प्राथमिक अवस्थेत होती आणि वेतन कमी होते; मात्र कामाचे तास भरपूर होते, स्त्रिया आणि चौदा वर्षांखालील मुलेही काम करीत असत;अशा वेळी सामाजिक सुरक्षेची हमी समाजाने वा सरकारने घ्यावी अशी गरज निर्माण झाली. त्यामध्ये प्रथम कामगार संघटनांनी पुढाकार घेतला, पुढे त्यांना कायद्याने संरक्षण प्राप्त झाले. सामाजिक जाणीव ठेवून समाजातील कमकुवत घटकांना मदतीचा हात देणे, हे प्रगत मानवी संस्कृतीचे लक्षण समजले जाते. समाजानेच आपत्तींविरुद्घ संपूर्ण संरक्षण द्यावे, हा विचार अधिकतर दृढतर होत चालला आहे. याच विचाराला सामाजिक सुरक्षा असे म्हणतात.
सामाजिक सुरक्षा योजनेचा प्रारंभ जर्मनीने १८८३ मध्ये आजारीपणासाठी विमा (सिकनेस इन्शुरन्स) कायदा संमत करून त्यानंतर त्या देशाने १८८९ मध्ये पहिला सक्तीचा वृद्घत्व, अपंगत्व आणि अन्य व्याधी संदर्भांत विमा योजना कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर अनेक देशांनी जर्मनीच्या धर्तीवर कायदे संमत केले. त्यांपैकी ग्रेट ब्रिटन (१९०८), स्वीडन (१९१३), दक्षिण आफ्रिका (१९२८), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१९३५), कॅनडा (१९४०), मलेशिया (१९५१) आणि सिंगापूर (१९५३) या देशांनी सामाजिक सुरक्षेसाठी विमा योजनांना विधिवत स्वरूप दिले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक सर्व विकसित आणि विकसनशील औद्योगिक देशांनी सामाजिक सुरक्षा पद्घतीचा अवलंब केला असून पहिल्या व दुसऱ्या महायुद्घांनी त्याची निकड व महत्त्व जगाला पटवून दिले. परिणामतः बेकारी, वृद्घत्व, अनारोग्य ( व्याधीगस्तता ), मृत्यू , अपंगत्व, मतिमंदता वगैरे संवेदनशील नैसर्गिक अवस्थांबाबत सुरक्षा देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित झाल्या आणि बहुतेक देशांनी सामाजिक विमा योजना अंमलात आणली. या बाबतीत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी व्यापक प्रमाणात सामाजिक विमा योजना हाती घेतल्या. त्यामुळे सामाजिक सुरक्षा ही संज्ञा आधुनिक काळात सामाजिक विमा या नावाने परिचित झाली आहे.
सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.