पूर्वी आडनाव प्रकार नव्हता त्यामुळे आपली ओळख सांगायला आपल्या वंशावळ तथा कुळाचा आधार घ्यावा लागे, गोत्र म्हणजे ते कुळ ज्यात तुम्ही जन्मले.
ब्राह्मणांची गोत्र ही ते ज्या ऋषींच्या वंशातील होते त्यांच्या नावाने असतात.
ऋषींच्या नावावरून येणाऱ्या गोत्रांच्या संख्येबद्दल इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे म्हणतात की
गणसूत्रांत पाणिनि गोत्रनामें देतो तीं सुमारें तीन साडेतीनशें व्हावीं. बौधायनाच्या कालीं गोत्रें अर्बुद झालीं होतीं. अर्थात् पाणिनि व बौधायन ह्यांच्यांत अंतर कित्येक शेंकडों वर्षांचें असलें पाहिजे. सूत्रांतून जीं गोत्रनामें दिलेलीं आढळतात - बौधायन, कात्यायन, आश्वलायन इत्यादि-तीं फार तर शंभर दोनशें भरतील. परंतु, स्मृत्यनुसार जीं गोत्रनामें दिलेलीं आहेत त्यांची संख्या सुमारें ५००० पांच हजार भरते. निरनिराळे ग्रंथ पाहून मीं जीं गोत्रनामें जुळविलीं आहेत त्यांची एकंदर संख्या सुमारें ५००० भरते.
तसेच श्री बापूशास्त्री मोघे धर्मशास्त्रावरील श्री काशिनाथ अनंत उपाध्याय लिखित धर्मसिंधु ग्रंथाचा मराठी अनुवाद करताना नमूद करतात की
सहस्र (१०००), प्रयुत (१०,००,०००), अर्बुद (१०,००,००,०००) गोत्रांची संख्या आहे असे वचन आहे, यास्तव जरीही गोत्रे अनंत आहेत तथापि एकुणपन्नास इतकेच गोत्रांचे भेद आहेत. कारण निरनिराळे प्रवरांचे भेद एकुणपन्नासच मिळतात.
ही सर्व सहस्र, प्रयुत, अर्बुद संख्येतील गोत्र मिळून यांचे वर्गीकरण आधी ७ गणांमध्ये आणि त्यात पुन्हा ५० गोत्रांमध्ये केले आहे.
धर्मसिंधु ग्रंथातच या ५० गोत्रांची नावं गणांनुसार खालीलप्रमाणे
७ भृगुगण
२ जामदग्न्यगण
विद (विद, शैल, अवट इत्यादि २०+ भेद)
वत्स (वत्स, मांडुकेय, मार्कंडेय इत्यादि २००+ भेद)
५ केवल भृगुगण
आर्ष्टीषेण (आर्ष्टीषेण, ग्राम्यायण, नैर्ऋति इत्यादि २०+ भेद)
यस्क (यस्क, मौन, मूक इत्यादि ५३+ भेद)
मित्रयु (मित्रयु, रौष्ठायन, सापिंडीन इत्यादि ३०+ भेद)
वैन्य (वैन्य, पार्थ, बाष्कल, श्येत हे भेद)
शुनक (शुनक, गार्त्समद, यज्ञपती इत्यादि १७+ भेद)
१७ आंगिरसगण
१० गौतमगण
दिर्घत्तमा
वामदेव
बृहदुक्थ
राहुगण
सोमराजक
आयास्य (आयास्य, श्रोणीवेध, मूढरथ इत्यादि १८+ भेद)
शारद्वत् (शारद्वत्, अभिजित, रौहिण्य इत्यादि ७०+ भेद)
करेणुपाली (करेणुपाली, वास्तव्य, श्वेतीय इत्यादि ७+ भेद)
कौमंड (कौमंड, मामंथरेषण, मासुराक्ष इत्यादि १०+ भेद)
औशनस (औशनस, दिश्य, प्रशस्त इत्यादि ९+ भेद)
काही ग्रंथांमध्ये या १० गौतमांव्यतिरिक्त अजून २ गण सांगितले आहेत जे खालीलप्रमाणे
राघुव
उतथ्य
भारद्वाजगण
भारद्वाज (भारद्वाज, क्षाम्यायन, देवाश्व इत्यादि १६०+ भेद)
गर्ग (गर्ग, सांभारायण, सखीनी इत्यादि ५०+ भेद)
ऋक्ष (ऋक्ष, रौक्षायण, कपिल इत्यादि ९+ भेद)
कपि (कपि, स्वस्तितरि, दंडी इत्यादि २५+ भेद)
केवल आंगिरसगण
हारीत (हारीत, सौभग, नैय्यगव इत्यादि २५+)
रथीतर (रथीतर, हस्तीद, नैतिरक्षि इत्यादि १४+ भेद)
मुद्गल (मुद्गल, सात्यमुग्रि, हिरण्यस्तंबि इत्यादि १८+ भेद)
विष्णुवृद्ध (विष्णुवृद्ध, शठ, भरण इत्यादि २५+ भेद)
कण्व (कण्व, औषमर्कट, बाष्कलायन इत्यादि २१+ भेद)
कुत्स
१० विश्वामित्रगण
कुशिक (कुशिक, पर्णजंघ, वारक्य इत्यादि ७०+ भेद)
लोहित/रोहित (लोहित/रोहित, कुडक्य, चाक्रवर्णायन इत्यादि ५+ भेद)
कत (कत, औदुंबरि, शैशिरी इत्यादि २०+ भेद)
धनंजय (धनंजय, पार्थिव, बंघुल इत्यादि ७+ भेद)
कामकायन (कामकायन, देवश्रवस्, देवतरस् इत्यादि ५+ भेद)
अज
रौक्षक
अघमर्षण
पुरण
इंद्रकौशिक
काही ग्रंथांमध्ये या १० विश्वामित्रांव्यतिरिक्त अजून ११ गण सांगितले आहेत जे खालीलप्रमाणे
आश्मरथ्य
साहुल
गाथिन
वैणय
हिरण्यरेतस्
सुवर्णरेतस्
कपोतरेतस्
शालंकायन
घृतकौशिक
कथक
रौहिण
४ आत्रेयगण
अत्रि (अत्रि, भूरि, छांदि इत्यादि ९४+ भेद)
गविष्ठिर (गविष्ठिर, दक्षि, भलंदन इत्यादि २४+ भेद)
मुद्गल (मुद्गल, शालिसंधी, अर्णप इत्यादि १०+ भेद)
वाद्भुतक
काही ग्रंथांमध्ये या ४ आत्रेयांंव्यतिरिक्त अजून ५ गण सांगितले आहेत जे खालीलप्रमाणे
अतिथी
वामरथ्य
सुमंगल
बीजवाप
धनंजय
३ काश्यपगण
निध्रुव (निध्रुव, कश्यप, अष्टांंगिरस् इत्यादि ४०+ भेद)
शंडील (शंडील, कोहल, उदमेघ इत्यादि ६०+ भेद)
रेभ
४ वासिष्ठगण
वसिष्ठ (वसिष्ठ, वैतालकवि, रकी इत्यादि ६०+ भेद)
कुंडीन (कुंडीन, लौहितायन, गुग्गुलि इत्यादि २५+ भेद)
उपमन्यू (उपमन्यू, औदलि, मांडलेखि इत्यादि ७०+ भेद)
पराशर (पराशर, कांडुशय, वाजि इत्यादि ४७+ भेद)
४ आगस्त्यगण
अगस्ती
पूर्णमास
हिमोदक
पाणिक
संभवाह
सोमवाह
यज्ञवाह
दर्भवाह
सारवाह
इघ्मवाह (इघ्मवाह, विशालाद्या, स्फालायन इत्यादि ५०+ भेद)
क्षत्रिय आपल्या कुळाच्या गुरुचे नाव गोत्र म्हणून लावत जसे की श्रीकृष्णाचे गार्ग्य होते, श्रीरामाचे वासिष्ठ होते. बुद्धांच्या काळानंतर अनेक क्षत्रिय बौद्ध झाले आणि काळाच्या ओघात गोत्र विसरले पण पुढे जेव्हा कुमारीलभट्ट, आद्य शंकराचार्यांच्या उपदेशाने पुनः हिंदू झाले तेव्हा गोत्र माहिती नसल्याने त्यांने आपल्या कुळाच्या पुरोहितांचे गोत्र स्वीकारले. पुढील काळात क्षत्रिय वर्ण स्थलकालपरत्वे राजपूत, मराठा, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, सोमवंशी क्षत्रिय पाठारे वगैरे वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेला. तेव्हा या सर्व क्षत्रिय जातींच्या गोत्रांचा आकडा वेगवेगळा आहे आणि एखादे गोत्र प्रत्येक जातीत येईलच असे नाही. त्यामुळे ब्राह्मणांची/कुलपुरोहितांची जी गोत्रं तीच क्षत्रियांमध्येही आढळतात.
दक्षिणेकडे आर्य वैश्य/कोमटी लोक हे त्यांच्या कुळातील ज्या व्यक्तीने वासवी कन्यका परमेश्वरी सोबत यज्ञात उडी घेतली त्या कुलपुरुषाचे नाव गोत्र म्हणून लावतात जसे अंतकुल, चिरकुल, पुण्यशील, पडगेशील इत्यादि. ही अशी १०६ गोत्र या समाजात आहेत.
पांचाळ/विश्वाब्राह्मण/विश्वकर्मा या समाजातही ५ गोत्रं असून प्रत्येक गोत्राची स्वतंत्र ५-५ उपगोत्रं आहेत म्हणजे एकूण मिळून ही संख्या २५ भरते. ज्याबद्दल माहिती आपल्याला पांचाळ या उत्तरात मिळेल.
बंजारी/लंबाडी/लमाणी लोक त्यांच्या पूर्वजांच्या नावासच अवत, ओत प्रत्यय लावून गोत्राचे नाव सांगतात जसे रामावत, विसलावत, भानोत, धारावत वगैरे ज्यांची संख्या बरीच मोठी आहे.
त्यामुळेच प्रत्येक समाजातील गोत्रांची संख्या वेगवेगळी आहे पण महाराष्ट्र तथा उत्तर भारतीय बऱ्याच समाजांमध्ये वैदिक आणि पौराणिक ऋषींच्या नावावरूनच गोत्रांची नावं जास्त आढळतात ज्यांची संख्या जाती आणि पोटजातींनुसार वेगवेगळी आहे.
एकूण गोत्र किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.