भाषा : मानवी विकासाच्या इतिहासात भाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण मानव व मानवेतर प्राणी असा फरक करतो, निसर्ग आणि मानव असाही फरक करतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे निसर्गापुढे इतर प्राण्यांना नमून वागावे लागते, तसे ते मानवाला नेहमीच वागावे लागत नाही. निसर्गावर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे, याची त्याला जाणीव आहे आणि ती वाढवण्याताचा तो बुद्धिपुरःसर, नियमितपणे, सतत प्रयत्न करतो आहे, ही गोष्ट आता स्पष्ट आहे.
भाषिक परिवर्तन : अगदी ऐतिहासिक काळातले भाषेचे नमुने घेतले तरी हे लक्षात येईल, की तिचे स्वरूप अनेक अंगांनी एकसारखे बदलते आहे. त्यामुळे परिवर्तन आणि परिवर्तनक्षमता हे भाषेचे प्रारंभापासूनचे गुण आहेत, असे दिसून येते. अर्थात परिवर्तनक्षमता आहे म्हणूनच परिवर्तन होते. पण ही परिवर्तनक्षमता भाषेत कशामुळे येते, हे पाहिले म्हणजेच भाषेचे सत्यस्वरूप आपल्या लक्षात येईल.
भाषेचे स्वरूप द्विविध आहे, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. ते ध्वनींनी बनलेले, परंतु आशयात्मक किंवा अर्थवाहक असे आहे. यातील ध्वनिरूप हे गौण असून अर्थ हा प्रधान आहे. ध्वनी व अर्थ यांत कोणताही कार्यकारणसंबंध नाही. ते परंपरेचे नाते आहे. म्हणूनच एकत्र व्यवहार न करणाऱ्या समाजांत एकच अर्थ किंवा आशय एकाच काळी भिन्न भाषांतून भिन्न ध्वनिरूपांनी व्यक्त होऊ शकतो, एवढेच नव्हे तर एका भाषेतही कालानुसार भिन्न ध्वनिरूपे धारण करतो. ध्वनीच्या या गौणत्वामुळेच तो हळूहळू बदलत गेला, तरी त्याचा परिणाम आशयावर होत नाही किंवा कालांतराने ध्वनी ठळकपणे बदलला, तरी त्याचा परिणाम अर्थावर होत नाही.
भाषा आत्मसात करताना काही अंशी, कानाला पटकन उमगणार नाही इतक्या प्रमाणात, तिचे बाह्य असे ध्वनिरूप बदलले तर ती भौतिक साधनात घडून येणारी एक स्वाभाविक प्रक्रियाच मानावी लागेल. प्रारंभी सूक्ष्म असे हे स्खलन त्यात भर पडत पडत स्पष्ट होते, पण ते बोलणाऱ्या व्यक्तींना जाणवत नाही. आपण आपल्या गत पिढीतल्या लोकांप्रमाणे बोलतो आहोत असे नव्या पिढीला वाटते, तर आपली मुले आपल्यासारखेच बोलताहेत, ही जुन्या पिढीची खात्री असते.
नव्या व जुन्या पिढीतले खरे अंतर भाषिक नसते. ते भावनात्मक, सांस्कृतिक, नव्या सवयींचे, थोडक्यात म्हणजे आशयात्मक असते आणि भाषिक असलेच तर जुन्या पिढीला अपरिचित असे विचार किंवा वागणे या संबंधात असते. विचार, सवयी, नव्या वस्तू, वैज्ञानिक प्रगती इत्यादींमुळे भाषेचा आशय-विषय असे जे समाजजीवन तेच बदलते आणि मग भाषेलाही नव्या संकेतांचा आधार घ्यावा लागतो.
समाजजीवनातील बदल अंतर्गत घडामोडींमुळे किंवा संघर्षामुळे आणि बाह्य संपर्कामुळे, इतर समाजांच्या वर्चस्वामुळे, इतर काही भाषांच्या प्रतिष्ठेमुळे, त्यांच्यातील आकर्षक व उपयुक्त वाटणाऱ्या चालींच्या-जीवनपद्धतीच्या-प्रगतीच्या अनुकरणामुळे घडून येतो. आर्य, ग्रीक, हूण, तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज इत्यादींच्या लागोपाठ झालेल्या आक्रमणांचा इतिहास विचारपूर्वक व निःपक्षपातीपणे पाहिला आणि त्या संदर्भात भारतीय भाषांच्या परिवर्तनाचा अभ्यास केला, तर ही गोष्ट नीट समजू शकेल. या परिवर्तनापलीकडे जाऊन स्वभाषेचा त्याग करून परभाषेचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. भारतातील इंग्रजीभाषिक ख्रिस्ती समाज व उर्दूभाषिक मुस्लीम समाज ही त्याची आधुनिक काळातही ठळक उदाहरणे म्हणता येतील.
भाषेचा विकास : शैली व साहित्य : नित्य व्यवहारातली भाषा जाणीवपूर्वक वापरली जात नव्हती. ती एक चाकोरीतून जाणारी आवश्यक अशी सामाजिक सवय होती. विशिष्ट संदर्भात, विशिष्ट संकेत, विशिष्टपणे वापरणे एवढेच तिचे कार्य. पण या नियमबद्ध वापरात ज्यावेळी व्यक्तिवैशिष्ट्याची भर पडली, किंवा या नियमबद्ध रूपाबाहेर जाऊन आपले असे खास काहीतरी आपल्या पद्धतीने सांगण्याची व्यक्तीला जरूर वाटली, त्या वेळी भाषेचे जे व्यक्तीत्वाचा छाप असलेले स्वरूप अस्तित्वात आले ते म्हणजे शैली. आपले शिकारीतले अनुभव सांगताना, एखाद्याच्या गैरहजेरीत घडलेल्या घटना त्याला कळवताना, गोष्ट सांगताना, अनुभव व्यक्त करताना भाषेत शैलीचा वाटा मोठा असतो. शुद्ध आशयापलीकडे व्यक्तीचा उत्साह, नाराजी, आनंद, द्वेष, मत्सर इ. विकारांचे त्यात कळत नकळत मिश्रण होतेच. बोलणे ही जरी शारीरिक क्रिया असली तरी आशय, अनुभव व्यक्त करणे ही व्यक्तिविशिष्ट मानसिक क्रिया आहे. भाषा हा सामाजिक वारसा असला, तरी तिचा उपयोग ही एक व्यक्तिनिष्ठ क्रिया आहे आणि तिच्यातून व्यक्तिभिन्नत्व प्रतिबिंबित होणे अपरिहार्य आहे.
भाषा म्हणजे काय ते सांगून व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्व स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.