हरिभाऊ आपटे कथेला काय म्हणतात?

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

ह.ना. आपटे यांच्यासंबंधीची पुस्तके

आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (इ.स. १९६३)
सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर, सु. रा. चुनेकर)
हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक रा.भि. जोशी)
हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे
हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (इ.स. १९२२) : लेखक बापुजी मार्तंड आंबेकर
ह.ना. आपटे (कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग) (बापुजी मार्तंड आंबेकर)
ह.ना. आपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
हरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर.
हरिभाऊ आपटे यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी -'मी' -डॉ. रेखा वडिखाये

हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे.स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुषजातीची आणि समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी या कादंबरीत वर्तवली आहे. हरिभाऊंचे वडील कुटुंब सोडून गेल्यामुळे आईच्या वाट्याला आलेले दुःख, बहीण गंगी तिचा साठीच्या आतबाहेर असलेल्या पुरुषाशी झालेला जरठबाला विवाह, घराघरांत असलेल्या गंगीसारख्या स्त्रियां, त्यांची अवस्था बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे या जाणिवेतून हरिभाऊंनी त्याकाळी स्त्री शिक्षणाचा जोरकसपणे पुरस्कार केला. हरिभाऊ आपटे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या या कादंबरीत समाविष्ट केलेल्या पत्रात समाजसुधारणेविषयीची त्यांची तळमळ प्रकर्षाने जाणवते. ते म्हणतात,"एकोणविसाव्या शतकानंतर आता आपला शत्रू म्हणजे आपले अज्ञान. आज हजारो वर्षे जगाचे पाऊल पुढे पडत आहे ते ज्ञानाच्या जोरावर. ज्ञानाचे स्थान एकेकाळी आपला आर्य देश होता. पुढे इजिप्त झाला, पुढे रोम झाला. पुढे फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड, अमेरिका इत्यादी देश होत गेले आहेत. आता जपानमध्ये ते आले आहे. कालचक्राप्रमाणे ज्ञानाने आपले स्थान बदलले. ज्या स्थानांतून त्याचा लोप झाला त्या स्थानांचे वैभवही लयास गेले.म्हणून अज्ञानरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करणे हेच मोठे अकुंठित गतिशात्र आहे."( ' मी ' -पृ.क्र. ४५३ ,४५४) समाजातील केवढा मोठा मानवसमूह पुरुषप्रधान संस्कृतीने अज्ञानाच्या अंधारात ठेवल्याने त्याच्याजवळ असलेल्या विविध क्षमतांचा समाजविकासासाठी आणि देशविकासासाठी वापर होऊ शकत नाही, याचे दुःख हरिभाऊ वरील परिच्छेदात अतिशय कळकळीने व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या या विचारांची आजच्या समाजालाही नितांत गरज आहे.स् त्रीशिक्षण आणि स्त्री -पुरुष समानतेचा विचार हा या कादंबरीचा गाभा आहे. यायोगेच कुटुंबाचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास घडून येणार आहे.